
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने शेतात काम करून घरी जाणाऱ्या वृद्धावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कविटपेठ गावातील शेतकरी शेतात काम करून बैलांना घरी परत घेऊन येत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाने तुळशीराम आत्राम (60) या शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तुळशीराम गंभीर जखमी झाले आहेत.
जुलै महिन्यात शेतीचा हंगाम सुरू असून शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना या घटने मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची गावकऱ्यांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी वनधिकाऱ्यांना माहिती दिली. वन अधिकारी तात्काळ घटना स्थळी पोहचले व जखमी तुळशीराम आत्राम यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. चिंचोली कवीटपेठ मार्गावरील घटना आहे. या मार्गाने वाहतूक सतत सुरू असते. हा मार्ग तेलंगना राज्याकडे जाणारा मार्ग आहे. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.





























































