
सुनील उंबरे । पंढरपूर
प्रदूषणाचा यादीत पंढरपूरची चंद्रभागा नदी पहिल्या क्रमांकावर आहे. मानवी विष्ठा आणि उद्योगव्यवसायाचे दूषित पाणी थेट नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता महत्वाची आहे. हा विषय आपण शासन दरबारी संवेदनशीलतेने मांडू असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले. येथील संत तनपुरे महाराज मठामध्ये वसुंधरा विकास संस्था, समग्र नदी परिवार आणि जलप्रदूषण विरोधी कृती समिती यांच्या वतीने आज ‘क्षमामि चंद्रभागा’ परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी कुल बोलत होते. यावेळी जलतज्ञ अनिल पाटील, अॅड. असिम सरोदे, सुनील जोशी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, रामेश्वर शास्त्री, श्यामसुंदर सोन्नार, डॉ. विजय परांजपे, पंचप्पा कलबुर्गे, भारत मल्लाव आदी उपस्थित होते.
कुल म्हणाले की, माझ्या दौंड मतदारसंघातून भीमा तथा चंद्रभागा नदी वहाते, त्यामुळे या नदीचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यासाठी व्यावहारिकते सोबत संवेदनशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू.
परिषदेत झालेले ठराव
अभियान लोकाभिमुख व्हावे, सुशोभिकरण न करता मूळ प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अभियानासाठी केवळ निधी नको तर विविध नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतीमधून चंद्रभागेत मिसळणारे पाणी पूर्णपणे थांबवावे, पंढरपूर येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपकेंद्र असावे,जो पर्यंत उजनी धरणामध्ये शुध्द पाणी येत नाही तो पर्यत सरकारने पाण्यासाठी फिल्टर बसवून द्यावेत, सरकारने नद्या आणि त्या संदर्भातील प्रश्नांची माहिती जाहीर करावी.





























































