बीडमध्ये ‘भगवा झंझावात’, चंद्रकांत खैरेंनी शिवसैनिकांशी साधला संवाद

2678

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आयोजित शिवसैनिकांच्या स्नेह मेळाव्याच्या आयोजनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याने बीडमध्ये भगवा झंझावात निर्माण झाला. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वज्रमुठ आवळून कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज बीडमध्ये शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडी, शिक्षक सेना, कामगार सेना, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना, इतर संलग्न संघटनाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसैनिकांनी उत्स्पुâर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यात शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, यांनी मार्गदर्शन केले. शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संपूर्ण मेळाव्याचे वातावरण भगवेमय झाले होते.

यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीवर बीड विधानसभा मतदार संघावर भगवा फडकावयाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. प्रत्येक शिवसैनिकाने वज्रमुठ आवळून कामाला लागायचे आहे. शिवसेनेची ताकद आणि शिवसैनिकांचे परिश्रम फळाला आले पाहिजे असेही ते म्हणाले.

रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या राजकारणातील प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी असणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघाचा उर्वरित विकास पूर्ण करायचा आहे, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, सहसंपरर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, महिला जिल्हा संघटक संगिता चव्हाण, योगेश क्षीरसागर, युवा जिल्हासंघटक सागर बहीर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या