बडे नेतेच सोडणार होते पंढरपूरच्या वारीत साप, चंद्रकांतदादा पाटलांच्या आरोपाने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री महापूजेसाठी पंढरपूरला आले तर वारीत साप सोडून गोंधळ उडवण्याचा कट होता. हा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाची टेप आमच्याकडे असून योग्यवेळी ती जाहीर करू, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न व यावरून तापलेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ या खासगी वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री व काही मंत्र्यांच्या बेलगाम वक्तव्यांमुळे आंदोलन चिघळल्याचा आरोप पाटील यांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नव्हते. वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट असल्याची त्यांनी दिलेली माहिती ही वस्तुस्थिती आहे. असा कट रचणाऱ्यांचे फोनवर जे संभाषण झाले. त्याची ध्वनिफितच सरकारकडे आहे. हे संभाषण बड्या नेत्यांमधील असून या प्रकरणी सरकारने कारवाईही सुरू केली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ’ते’ विधान केले होते. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, साप सोडण्याच्या धमकीमुळे वारकऱ्यांमध्ये घबराट पसरू नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी आषाढीची शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही मुख्यमंत्र्याला आषाढी महापूजा हा मोठा सन्मान असतो, परंतु मुख्यमंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता तेथे न जाण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाला याच टर्ममध्ये आरक्षण देणार

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द आम्ही दिला असून याच टर्ममध्ये निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा निर्णय होईल अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. सरकारचा मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबींवर अभ्यास सुरू आहे. कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकायला पाहिजे यासाठी पूर्ण अभ्यास करून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आधीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा फक्त अध्यादेश काढला होता. ज्या राणे समितीच्या अहवालानुसार निर्णय घेतला गेला ती समिती होती, आयोग नाही. त्यामुळेच कोर्टाने स्थगिती दिली. याला आव्हान देणाऱया याचिकेवर आमचं सरकार येण्यापूर्वीच सुनावणी पूर्ण झाली होती. फक्त निर्णय आमचं सरकार सत्तेत आल्यावर झाला.

‘आधीच्या सरकारने काढलेला अध्यादेश फेटाळला म्हणून आम्ही कायदा केला, पण न्यायालयाने तोही फेटाळला. मात्र त्यावेळी न्यायालयाने घटनेशी सुसंगत आरक्षण द्या असं सरकारला सुचवल्यावर मागासवर्ग आयोगाची स्थापना केली, आसल्याचे पाटील यांनी सांगितले. मागासवर्ग आयोगाचा निर्णय येईपर्यंत ओबीसींना आरक्षणानुसार ज्या ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजालाही मिळतील, असे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावरून आंदोलन पेटवू पाहणाऱ्यांचे रेकॉर्डिंग असल्याचे वादग्रस्त विधाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केल्याने त्याचे संतप्त पडसाद कोल्हापुरात दसरा चौक येथे चंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.