>> चंद्रकुमार देशमुख
आपल्या प्रकृतीच्या गुणधर्मानुसार आपली सर्वांगीण वाढ होत असते. व्यक्तिमत्त्व उभारणीत प्रकृतीतील हे गुणदोष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे आयुर्वेद मानते. या गुणधर्मांना आधीच ओळखल्यास निरोगी शरीर आणि निकोप वृद्धी हे समीकरण साधता येते.
आयुर्वेद विषय आला म्हणजे अगदी बीज शुद्धीपासून विचार केला जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात न “शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’’. बीज जर शुद्ध असेल तर त्याला लागणारे फळ हे शुद्ध असते.
समाजामध्ये आयुर्वेद चिकित्सक म्हणून सेवा देत असताना या फ्री इंटरनेट संस्कृतीपासून अगदी भयंकर अनुभव यायला लागले आहेत, जसे सहावीचा मुलगा डिप्रेशनमुळे जीव संपवतो, सातवीची मुलगी बॉयफ्रेंड बोलत नाही म्हणून हात कापते, 10 वी च्या आतली मुलं अफू, गांजा, अगदी दारूदेखील घेताना घरचे पकडतात व प्रबोधनासाठी घेऊन येतात. मग असे झाल्यावर काय करावे हे आईवडिलांना माहीतच नसते. आपला पाल्य असा आहे किंवा असा काही करेल याचा त्यांना अंदाज नसतो.
यामध्ये आयुर्वेद हा खूप मोलाचा ठरतो. आम्ही ज्ञानप्रबोधिनी सारख्या शाळेत जाऊन प्रकृती परीक्षण करत असतो आणि अगदी जीवन बदलून जाईल असे आयुर्वेद मदत करते असा अनुभव आला आहे. ‘सम्यक करोति इति संस्कारः’ जे चांगले केले जातात व जे टिकतात त्यांना संस्कार म्हणतात. शाळेतही हेच केले गेले पाहिजे. “Master of none and jack of all” अशी पिढी आज काल तयार होत आहे. त्याला थांबवणे म्हणजे संस्कार होय. पण स्वतची प्रकृती समजल्याशिवाय कसे करणार? आपल्याला आपला पाल्य व त्यांची प्रकृती काय हे समजले की तो काय करू शकेल याचा अंदाज येतो. मी नेहमी सांगत असतो जन्माला वाघ आला असेल तर मरतानादेखील वाघच असतो. त्यात बदल होत नाही आणि सामान्यत ह्या प्रकृती कशा असतात हे पाहूया.
वात प्रकृती
वातप्रधान प्रकृतीची मुले म्हणजे चंचल स्वभाव, अस्थिर मन, बैठक नसणे, शरीर कोरडे असणे, शरीर न वाढणे, खाल्लेले अंगाला न लागणे, एका जागेवर जास्त वेळ स्थिर बसू न शकणे, Imagination, fantacy मध्ये राहणे, Gadgets ची खूप आवड. सतत गुंतलेले असणे, सतत रडणे, किरकिर करणारा स्वभाव, रंगाने देखील कमी असणे, अल्प बळ असणारी, सतत चपल आणि धावणारी, यांची स्वप्नंदेखील हवेत उडणारी, पळापळ करणारी, धावणारी आणि गडबडीची असतात.
पित्त प्रकृती
पित्त प्रधान प्रकृतीची मुले ही अत्यंत राग असणारी, उलट बोलणारी, लिडरशिप करणारी, न ऐकणारी, अत्यंत बुद्धी असणारी पण अति आत्मविश्वास, कमी अभ्यासात जास्त मार्क घेणारी, यांना उष्णता आणि आग जास्त होते, घाम जास्त येतो, भूक सहन नाही होत, लगेच खायला लागणारी, व्यसन लवकर लागू शकणारी अशी असतात. प्रचंड हट्टी, शीघ्र कोपी, संताप, केस पांढरे होणारी, स्पष्ट आणि अचूक मत असणारी असतात.
कफ प्रकृती
अत्यंत स्थिर प्रकृती, आळस, उठायला आणि काम करायला कंटाळा, शरीर थंड, जाड व स्थूल, लवकर वजन वाढणारे, सतत सर्दी होऊ शकणारे, आहार कमी पण शरीर उत्तम असते. केश घन, अल्पसंतुष्ट, बाहेर जायला आळस, स्मरणशक्ति अगदी उत्तम, आरोग्य चांगले व दीर्घ आयुष्य, निरोगी राहणारे.
अशा प्रधान प्रकृतीमध्ये आपण त्या मुलांचे वर्गीकरण करतो. जर आपल्याला आणि आपल्या मुलाला आपली प्रकृती माहिती असेल तर आपल्याला ध्येय गाठताना सोपे जाते आणि अंथरूण पाहून पाय पसरवणे असे कार्य करता येते.
वात प्रकृतीची मुले अगदी चंचल असतात आणि मन स्थिर असते. यामुळे त्यांना सतत ध्येयाची आठवण करून द्यावी लागते. त्यांचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणे, सतत मागे लागून अभ्यास करून घेणे, आभासी यंत्रणांचा वापर करणे, वेगवेगळे सराव करून घेणे, कामासाठी अतिशय कष्ट करायला लावणे या गोष्टी अनिवार्य ठरतात. पित्त प्रकृतीच्या मुलाला राग खूप असतो पण खूप बुद्धिमान असतात. एकदाच सांगावे लागते, पण अशा मुलांना प्रलोभनं जास्त असतात, व्यसनं लवकर लागतात.
कफ प्रधान मुले आळशी असल्याने मागे लागून, शिक्षा देऊन, अभ्यास, काम करून घ्यावे लागते. मुळात बुद्धी खूप पण आळस तेवढाच. एकदा केले की बस्स, पण ते करून घेण्यासाठी कडक पालकत्वाची आवश्यकता असते. आजकालची पिढी इतकी समजूतदार आहे की त्यांना जर कळले की ते स्वत कसे आहेत, तर आयुष्यात खूप फरक पडतो.
आयुर्वेद हा चिकित्सा पुरता मर्यादित नसून, कसे जगायचे असा वेद आहे आणि आज या पिढीला याची खूप गरज आहे. अगदी एक उदाहरण – मी चिंचवडहून व्याख्यानासाठी ओला कॅबमधून एयरपोर्टला जात होतो. सकाळची पाच वाजताची वेळ, साधारण एक तास लागतो पोहोचायला. तर त्या एक तासात त्या ड्रायव्हरने एकही शब्द न चुकता 12 हिंदी गाणी म्हटली, केवढी ती बुद्धिमत्ता. मी डॉक्टर असून एकही गाणे पाठ नाही. जेव्हा पोहचलो तेव्हा त्याला सांगितले की तू कलेक्टर होण्याची बुद्धी असताना ड्रायव्हर झालास याचे कारण काय असेल माहिती आहे का? तो म्हणाला, ‘नाही सर.’ तर कारण हे पित्त प्रकृतीचा राग होता (त्याने बायकोला साध्या प्रश्नावर दोन शिव्या दिलेल्या) आणि या रागामुळे आणि अतिआत्मविश्वासमुळे तो ध्येय चुकला .
आयुर्वेदाचे प्रकृती परीक्षण हे पूर्वी गुरु लोक करायचेच आणि प्रकृतीनुसारच व्यवसाय अथवा नोकरी ठरली जायची म्हणजे उत्तम. पण आता सगळ्यांचा एकच आग्रह तो म्हणजे डॉक्टर, इंजीनियर आहे. मग या युगात मूल तणाव सहन नाही करत. काही व्यसन करतात तर काही काहीच करत नाहीत. आपल्या वाघांची प्रकृती माहिती असेल तर आपण त्याला सरकारी पिंज्रयात जाण्याचा आग्रह करूच नये. आपलं पोर कासव असेल तर ते धावण्याच्या शर्यतीत जिंकणार नाही पण आरोग्याची शर्यत असेल तर तोच जिंकेल. हरिण आहे आपलं लेकरू तर तो उडण्याची शर्यत नाही जिंकणार पण धावण्याची शर्यत नक्कीच जिंकेल… कदाचित सुंदर दिसण्याची देखील. म्हणूनच आपले पाल्य, आपली शाळा आणि आपल्या प्रकृतीसाठी आपला आयुर्वेद हा खूप महत्त्वाचा.