
मनपा प्रशासनात कार्यरत आशा वर्कर कर्मचाऱ्यांना वाढीव 4 हजार रुपये भत्ता न दिल्याने सदर आंदोलनाला शिवसेना महिला आघाडीने जाहीर पाठींबा दिला आहे. कोरोनाकाळात जानेवारी ते मे च्या कालावधीत ‘आशा वर्कर’नी घरोघरी जावून तपासणी व विचारपूस केली. यामागे आशा वर्करचे परिश्रम व कष्ट आहे. परंतु मनपा प्रशासन मात्र गरज सरो वैद्य मरो या भूमिकेत आहे. आशांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशा इशारा शिवसेनेच्या माजी जिल्हा संघटिका तथा ज्येष्ठ नेत्या कुसूम उदार यांनी यावेळी दिला. महिला आघाडीच्या निशा घोंगडे, आदींनी ठिय्या आंदोलन स्थळाला भेट दिली व प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.
कोरोना काळात देखील आपली जबाबदारी जीव धोक्यात घालून चोखपणे पार पाडणाऱ्या आशावर्कर कार्यकर्तीना जवळपास जानेवारी महिन्यापासूनचे 10 महिन्यांचे प्रलंबित 4000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता शासनाकडून देण्यात आलेला नाही. या प्रमुख मागणीसह इतरही विविध मागण्यांना घेऊन आशांनी महानगर पालिके समोर मंगळवारपासून बेमुदत मुक्कामी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आयटकशी संलग्नित महाराष्ट्र राज्य खाते आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात या आंदोलनात चंद्रपूर शहरातील जवळपास सव्वाशे आशावर्कर महिला सहभागी झाल्या आहेत. सध्या दिवाळी सण तोंडावर असताना तुटपुंजे 4000 रुपयांचे 10 महिन्यांचे मानधन देखील सन्मानजनक वागणूक देण्यात यावी, नियमित केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित द्यावा, यापुढे दर महिन्याच्या 1 तारखेला आशांच्या खात्यात कामांचा मोबदला जमा करावा, आदी मागण्यांसाठी महानगरपालिका स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाचे अस्त्र उचलले आहे.































































