चंद्रपुरात प्लॉट विक्रीच्या नावाखाली फसवणूक, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकदा पैसे जमा करा व दर महिन्याला मिळवा आकर्षक व्याजासाहित रक्कम, अशा आमिषाला नागरिक अनेकदा बळी पडले आहेत. मात्र आजही अनेक नागरिक अशाच आमिषाला बळी पडताना दिसत आहेत.

असाच एक प्रकार चंद्रपुरातील दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे, तुकुम येथील 38 वर्षीय भरत नानाजी धोटे यांनी भार्गवी लँड अँड डेव्हलपर्सच्या नावाने खासगी मर्यादित कंपनी स्थापन केली. त्यानंतर खाजगी एजंट नेमत प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. पद्मापुर येथील प्लॉट क्रमांक 123/01 (क), 123/01 (ड), 123/01(इ) वरील जागेवर 1000 चौरस फुटाचा प्लॉट 30 महिन्यासाठी किंमत अडीच लाख हा युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड च्या नावाने करार करीत, त्या प्लॉट वर कुट्याचे बांधकाम करीत प्रत्येक प्लॉट धारकाला महिन्याचे 7 हजार 83 रुपये दर महिन्याला प्लॉट धारकाच्या बँक खात्यात 30 महिन्यासाठी जमा करण्यात येईल.

पर्यटकांना रिसॉर्टप्रमाणे सदर कुट्या भाड्याने देत त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून सदर रक्कम प्लॉट धारकाला देण्यात येईल असे आमिष देण्यात आले. त्यानंतर एप्रिल मे महिन्यात प्लॉट धारकांच्या नावाने वेगवेगळ्या प्लॉटची रजिस्ट्री करण्यात येणार असे आमीष सर्व प्लॉट धारकांना देण्यात आले. धोटे यांनी 15 ते 16 नागरिकांकडून अडीच लाखांची रक्कम गुगल पे, फोन पे, आरटीजीएसमार्फत जमा केली.

सदर प्लॉटचा करारनामा भार्गवी लँड अँड डेव्हलपर्सच्या नावाने स्टॅम्प पेपरवर नोटरी करीत विसारपत्र युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम नावाने स्वतः भरत धोटे यांनी करारनामा जानेवारी महिन्यात करून दिला. त्यानंतर पुढील 2 महिने काही प्लॉट धारकांच्या खात्यात 7 हजार 83 रुपये जमा करण्यात आले, मात्र त्यानंतर पैसे येणे बंद झाले व प्लॉट धारकांना रजिस्ट्री करून देण्यात आल्या नाही.

या प्रकरणात फिर्यादी म्हाडा कॉलनी दाताला निवासी अशोक पांडुरंग भटवलकर यांनी भरत धोटे, भार्गवी लँड अँड डेव्हलपर्सच्या नावाने खासगी कंपनी स्थापन करीत प्लॉट धारकांची तब्बल 41 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दुर्गापुर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. दुर्गापूर पोलिसांनी फसवणूक प्रकरणात भरत धोटे यांच्यावर कलम 420, 406, 467 व 468 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी भरत धोटे यांनी भार्गवी लँड अँड डेव्हलपर्सच्या नावाने कोणत्याही नागरिकांची फसवणूक केली असल्यास तत्काळ दुर्गापूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी नागरिकांना केले आहे.