
चंद्रपूर जिल्ह्यातील लसींचा साठा सध्या संपला आहे. जिल्ह्यातील सर्व 202 केंद्रांवर लसीकरण ‘बंद’ च्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. एकीकडे लॉकडाऊननंतरही जिल्ह्यात रुग्णसंख्या आजवरची सर्वोच्च आकडेवारी गाठत आहे तर दुसरीकडे संजीवनी ठरू शकणाऱ्या लसी संपल्याने नागरिक हतबल झालेत.
उद्या जिल्ह्यात 10 हजार लसी येण्याची शक्यता अधिकारी वर्गाने वर्तवली आहे. आजपासून 18 वर्षे वरील वयोगटासाठी लसीकरण प्रारंभ केले जायचे होते. मात्र लसीच नसल्याने आता शुभारंभ उद्यावर गेलाय. नव्या आदेशानुसार 18 वर्षापुढे लसीकरण करण्यासाठी उद्यासाठी 2 केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे.
या केंद्रावर सर्व 7 दिवस सरासरी रोज 200 व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. प्रशासनाने 18 वर्षे वयोगटावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी साडेसहा लाख लसींची मागणी राज्याकडे नोंदविली आहे. सर्व पुरवठा सुरळीत झाल्यास जिल्ह्यात निर्मित 265 केंद्रांवरून लसीकरण वेगवान केले जाणार आहे.

























































