अपघातात मरण पावलेल्या कुत्र्याला मिळाला न्याय, मालकाने आठ वर्षे लढवली केस

dog-chandrapur-accident-cas

रस्त्यावर एका अपघातात कुत्रा ठार झाला. हा कुत्रा मालकाचा जीव की प्राण होता. त्याच्या मृत्यूचे मालकाला अतीव दुःख झाले. दुःखावेग आवरल्यावर लाडक्या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याचे त्याने ठरवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल 8 वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अपघाताला दोषी असलेला बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून 3 लाख रुपये भरपाई मिळवली. अपघातातील आरोपीने कुत्र्याच्या मालकाला 3 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी 1993 मध्ये एका अपघातात हत्तीच्या मृत्यू झाल्यानंतर भरपाईसाठी दावा करण्यात आला होता आणि त्या प्रकरणातही भरपाई मिळाली होती. त्यानंतर कुत्र्याच्या अपघाती मृत्यूनंतर भरपाई मिळण्याची ही पहिली घटना असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील कुत्र्याच्या मालकाचे नाव उमेश भटकर आहे तर कुत्र्याचे नाव जॉन होते.

चंद्रपूर शहरानजीक असलेल्या तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर 10 जानेवारी 2013 ला सकाळी 6.30 वाजता आपल्या 11 महिन्यांच्या लाडक्या कुत्र्याला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते. तेवढ्यात भरधाव असलेल्या स्कूल बसने गोपाल दूध डेअरीच्या जवळ जॉनला धडक दिली. यामध्ये जॉनचा मृत्यू झाला. मेसर्स रहीम ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच 40 एन 3766 ने हा अपघात झाला होता. यानंतर भटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जॉनचे शवविच्छेदनही करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार अपघातात जॉनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोषी असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या विरोधात भटकर यांनी दीर्घ न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश दिला.

जॉनचा मृत्यू झाल्यानंतर अपघात दावा देण्याचा आदेश मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल चंद्रपूर ने दिला आहे. जॉन नामक कुत्रा आरती इन्फ्रा कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मालक भटकर यांना त्याचे 8000 रुपये प्रतिमहिना वेतन मिळत होते. स्कूल बसचालकाच्या बेपरवाहीमुळे जॉनचा मृत्यू झाला. परिणामी भटकर यांचे दर महिन्याला 8000 रुपयांचे नुकसान होत होते. भटकर यांनी बसचे मालक आणि इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्याचा पाठपुरावाही केला पण काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्याय मिळविला.

ॲड. जयप्रकाश पांडेय यांच्या माध्यमातून मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल केले. यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रहीम ट्रॅव्हल्स बस कंपनी आणि बसचालक सुधाकर थेरे या तिघांना दोषी धरले होते. भटकर यांनी 5 लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. हे प्रकरण न्यायालयात तब्बल 8 वर्ष चालले. अखेर उमेश भटकर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. 1,62,000 रुपये आणि त्यावर 8 टक्के दराने व्याज भटकर यांना द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले. भटकर यांच्या बाजूने जयप्रकाश पांडेय यांनी तर इन्शुरन्स कंपनीच्यावतीने ॲड. अभय कुल्लुरवार आणि बस मालकाच्यावतीने ॲड. एन.एस. सूर यांनी बाजू मांडली.