
कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱयाला किडनी विकायला लावल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱया या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा संतप्त सवाल केला जात आहे. बळीराजाच्या आभाळाएवढय़ा वेदनेकडे दुर्लक्ष करून मदतीच्या आकडय़ाचा खेळ दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱया सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे.
चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱया मिंथुर गावात हा अमानुष प्रकार घडला. रोशन सदाशिव कुडे असे पीडित शेतकऱयाचे नाव आहे. रोशनकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो. निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्या. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून 50-50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रक्टर आणि घरातील सामान विकले, मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
एवढा भयानक प्रकार घडूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असा आरोप कुडे यांनी केला. ‘मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, पण त्यांनी काहीच दखल घेतली नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझ्यावर किडनी विकण्याची वेळ आली नसती,’ असे ते म्हणाले.
सहा सावकारांवर गुन्हा दाखल, किडनीच्या आरोपाची वेगळी चौकशी
रोशन कुडे प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यावर सहा आरोपी सावकारांवर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर अशी त्यांची नावे आहेत. आरोपींवर कलम 29, 31, 32 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही सर्व कलमे अवैध सावकारीसंदर्भात आहेत. पीडित शेतकऱयाने किडनीसंदर्भात केलेल्या आरोपांची वेगळी चौकशी केली जाणार आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही किडनी कर्ज फेडण्यासाठीच विकली का, पंबोडिया देशात जाऊन त्याला ही किडनी का विकावी लागली, त्याला त्याची माहिती कुणी दिली, तो तिथपर्यंत कसा गेला, त्यासाठी माहिती आणि व्यवस्था कुणी केली, हे सगळे प्रश्न चौकशीत आहेत. त्यामुळे किडनीच्या संदर्भात अजून गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती चंद्रपूर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिली.
मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा
एक लाख कर्ज उचललं. 74 लाख दिले, मात्र अजूनही कर्ज पूर्णपणे संपले नाही. पैशासाठी तगादा सुरूच. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरलं नाही. आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासहित आत्मदहन करून मोकळा होतो, असे हताश उद्गार रोशन कुडेने काढले.
































































