
चंद्रपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालिकेने टेबलचं ड्रॉवर उघडलं अन ती जोराने किंचाळली. ड्रॉवरमधील दृश्य बघून कुणाचाही थरकाप उडाला असता. ड्रॉवरमध्ये चक्क मांजऱ्या साप होता. तसा हा साप निमविषारी मात्र सापाचा नावाने सामान्य माणूस गर्भगळीत होतो. हा थरकाप उडविणारा प्रसंग राजुरा तालुक्यातील सिंधी येथे घडला. सर्पमित्रांनी मोठ्या प्रयासाने सापाला जेरबंद केलं. या थरारक घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
जिल्ह्याला पुरानं वेढा घातला आहे. जिथं तिथं पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. या पुराच्या पाण्याने वन्यजीवांनी थेट गावाचा मार्ग धरला. वरोरा तालुक्यात निलगाय घरात शिरली तर रानडुक्कर चक्क छतावरून धावत सुटले होते. एका ठिकाणी शेतात मगर आढळली होती.
या घटना ताज्या असतानाच ग्रामपंचायतेचा टेबल ड्रॉवरमध्ये चक्क साप आढळून आला आहे.जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सिंधी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा थरारक प्रकार घडला आहे. या अनपेक्षित प्रकाराने संगणक चालिका चांगलीच धास्तावली आहे. दरम्यान, सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला जेरबंद केले. या घटनेचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
























































