चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांना आली जाग, आता शेतकऱ्यांची आठवण झाल्याने आज जाणार बांधावर

चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने आतापर्यंत अनेकदा झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती दोनदा निर्माण झाली. याचा नागरी वस्त्यांना आणि विशेषतः शेतीला मोठा फटका बसला. हजारो एकर शेती नष्ट झाली. यात सोयाबीन, कापूस आणि भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, एकाही मंत्र्याने नुकसानग्रस्त भागाकडे फिरकूनही बघितले नाही. सोमवारपासून अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भात थैमान घातल्याने अर्धे मंत्रिमंडळ राज्यात ठिकठिकाणी बांधावर आल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांना जाग आली.

आता त्यांना नाईलाजाने त्यांना बांधावर जावे लागत आहे. बुधवारी दुपारी ते वरोरा आणि चिमूर या दोन तालुक्यातील मोजक्या बांधावर जाणार आहेत. आजवर त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली नाही. आता अचानक त्यांना बांधावर जाण्याची घाई झाली आहे. वरातीमागून घोडे, अशी त्यांची कृती यापूर्वीही दिसून आली आहे. कालच चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर महामार्ग रोखला. बच्चू कडू यांनी इथे येऊन आंदोलन केले. त्यानंतर उईके यांनी शेतकऱ्यांना भेटीचा कार्यक्रम आखला. तोपर्यंत ते चंद्रपूरला केवळ शासकीय बैठका आणि थातूरमातूर कार्यक्रमांना दिसत यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याप्रती मोठा रोष आहे. बच्चू कडू यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.