
एरव्ही उष्णतेसाठी ओळखलं जाणारं चंद्रपूर शहर सध्या कडकडीत थंडी आणि धुक्याचा आस्वाद घेत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चंद्रपूर सोमवारचे तापमान 11.4 आहे
धुके…..गुलाबी थंडीचे….उत्साहाचे. हे धुके सध्या चंद्रपूरकरांच्या आकर्षणाचा विषय झाले आहे. थंडीच्या दिवसात असे धुके यापूर्वी अभावानंच बघायला मिळाले. त्यामुळं पहाटफेरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना हे धुके आकर्षित करीत आहेत. अशा गुलाबी थंडीत फिरण्याची मजा काही औरच असते. पहाटे चार-पाच वाजता तर समोरची व्यक्ती दिसू नये, एवढे दाट धुके शहरावर पसरले असते. या धुक्याचा आनंद केवळ हिल स्टेशनवर मिळतो, पण आता चंद्रपूरकरही घेऊ लागलेत.
एकीकडे थंडीचा आस्वाद घेणारे, आरोग्यासाठी थंडी सहन करणारे नागरिक दिसताहेत, तर दुसरीकडे गरिबीशी दोन हात करणाऱ्या मोळीवाल्या महिलाही याच थंडीत बघायला मिळाल्या. समाजातील ही दोन भिन्न रुपं थंडीच्या निमित्तानं बघायला मिळात आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात सक्रिय झालेल्या फेटाई वादळानं विदर्भाचं वातावरण पार बदलून टाकलं. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला आणि त्यानंतर कडाक्याची थंडी. ही थंडी पुन्हा आठ दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरकरांच्या नशिबी अशी थंडी दरवर्षी येत नाही. त्यामुळं संधी मिळताच नागरिक त्याचा आनंद घेत आहेत. धुके दाटलेले आहेत, पण ते आनंदाचे आणि उत्साहाचे आहेत. त्यामुळं हे धुके हवेहवेसे झाले असून, थंडी गरम कपड्यात आपलीशी वाटू लागली.























































