
कोरोनाच्या भीतीमुळे आजपर्यंत बंद असलेली देवालये आज भक्तांसाठी खुली झाली. नवरात्राचा आजचा पहिलाच दिवस असल्यानं या शुभदिनी देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी भल्या पहाटेच मंदिरात हजेरी लावल्याचं चित्र चंद्रपुरात बघायला मिळाले. चंद्रपूरचे प्रसिद्ध देवी महाकाली मंदिर आज पहाटे चार वाजताच महाआरतीसाठी खुले झाले. चंद्रपूरच्या या आराध्य देवीचे दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या. गाभाऱ्यात थेट प्रवेश नसल्यानं द्वारातूनच भाविकांनी दर्शन घेत मातेला साडी-चोळी अर्पण केली.
चंद्रपूरचे प्रसिद्ध देवी महाकाली मंदिर आज पहाटे चार वाजताच महाआरतीसाठी खुले झाले. चंद्रपूरच्या या आराध्य देवीचे दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या. pic.twitter.com/oMKWV0ixBq
— Saamana (@SaamanaOnline) October 7, 2021
बऱ्याच दिवसांनी आज मंदिर परिसर भाविकांनी फुलून आलेला दिसला. चैतन्यदायी वातावरण इथं बघायला मिळालं. पूजेच्या साहित्याची दुकानेही लागली. आजवर या साहित्य विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. पण आता तो सुरू झाल्यानं तेही खुश आहेत.
मंदिरात प्रवेशासाठी कोरोना नियमावली लावण्यात आली असून, त्याचं पालन करण्याची सक्तीही केली जात आहे. नवरात्रात देवी महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. दुरदुरुन भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. शिवाय चैत्रात मोठी जत्रा पण भरते. पण कोरोना संकटामुळे हे सारं ठप्प झालं होतं. आता नव्यानं मंदिराची दारं उघडी झाल्यानं ती कधीच बंद होऊ नये आणि कोरोना कायम हद्दपार व्हावा, हीच मागणी आता देवीचरणी केली जात आहे.




























































