
चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध कामांवर गंभीर लेखा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपानुसार विविध कामात एकूण 200 कोटींचा अपहार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
2015-16 दरम्यानच्या 71 कामांवर संभाजीनगर येथील लेखा परीक्षक पथकाने हे आक्षेप नोंदविले आहेत. आज झालेल्या मनपा आमसभेत हा अहवाल पटलावर ठेवण्यात आला तेव्हा आक्षेपांवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. कोविड काळातील आमसभा असल्याने केवळ गटनेते सभागृहात उपस्थित होते. मात्र महापौरानी ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगत यावर चर्चा करण्यास नकार दिला.
आमसभेनंतर विरोधी नगरसेवकांनी बाहेर घोषणाबाजी केली. विरोधी नगरसेवकांनी या बाबींची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सह महापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. विशेष म्हणजे आक्षेप घेतलेल्या काळात विद्यमान महापौरच पदावर होत्या. महापौरांनी सर्व आरोप फेटाळत विरोधी नगरसेवकांना मनपाची नियम पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.


























































