
वाघिणीवर वर्चस्व स्थापित करण्याच्या नादात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत ब्रम्हपुरी क्षेत्रातील ब्रह्मा या वाघाचा मृत्यू झाला आहे. या झुंजीत जिंकलेला छोटा मटका नावाचा वाघ जखमी झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. चिमूर तालुक्यातील निमढेला क्षेत्रातील छोटा मटका (टी-126) आणि ब्रह्मपुरी विभागातील ब्रह्मा नावाचा (टी-158) या वाघांमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी युद्ध झाले. चुरशीच्या झुंजीत ब्रह्मा नावाच्या वाघाचा मृत्यू झाला.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना असल्याने प्राणी बघण्यासाठी म्हणून मचानवर निसर्गप्रेमी बसले होते. याचदरम्यान ब्रह्मा हा वाघ पाणी पिण्यासाठी आला होता. याचवेळी ब्रम्हाचा पाठलाग करत सीएम म्हणजेच छोटा मटका हा वाघ त्याच जागी आला. यावेळी झालेल्या झुंजीत ब्रम्हा वाघाचा छोटा मटकाने फडशा पाडला आहे. तत्पूर्वी छोटा मटकाने बजरंग नावाच्या वाघाला शिकारीसाठी झालेल्या लढतीत ठार मारले होते. छोटा मटकाने केलेली शिकार खाण्यासाठी बजरंग आला असता दोन्ही वाघांमध्ये झुंज झाली. या वादात छोटा मटकाने बजरंगला ठार केले. विशेष म्हणजे या दोन-तीन झुंजीच्या वेळेस छोटा मटका हा वाघ राम दीघीच्या मंदिरात बसून होता व मंदिरातून निघून थेट तीनही लढती तो जिंकला व तीन वाघांना त्याने आतापर्यंत ठार केले आहे. पहिली लढत ही शिकारीसाठी झाली, दुसरी लढत ही अस्तित्वासाठी झाली आणि तिसरी लढत वाघिणीसाठी झाली.
चंद्रपुरातील तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘छोटा मटका’ नावाच्या वाघाने अस्तित्वाच्या लढाईत ब्रम्हा या वाघाचा आणि शिकारीसाठी झालेल्या लढाईत बजरंग या वाघांना ठार केले. त्याचबरोबर वाघीणीसाठी झालेल्या झुंजीतही त्याने वर्चस्व प्रस्थापित केले.#chandrapur #tadobanationalpark pic.twitter.com/HhK8M3C5GJ
— Saamana Online (@SaamanaOnline) May 16, 2025
नयनतारा नावाची तीन ते साडेतीन वर्षांची सुंदर वाघीण या क्षेत्रात आहे. हीच नयनतारा छोटा मटका व भानुसखिंडी यांची मुलगी आहे. याच परिक्षेत्रात छोटा मटका याचा संबंध असलेल्या बबली आणि झरणी या वाघिणींसाठी म्हणून ही झुंज झाली. 13 मे 2025 रोजी सकाळी उमरीखोरा परिसरात मृत वाघ आढळून आला. या वर्चस्वाच्या लढाईत छोटा मटकाने आपल्या क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. मागील काही वर्षात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे वाघांना अधिवास क्षेत्र कमी पडत असल्याने त्यांच्यात अधिवास आणि मादीकरिता संघर्ष वाढला आहे. या युद्धात ज्याची ताकद जास्त तो त्या क्षेत्राचा राजा असा जंगलाचा कायदा आहे.
बुद्ध पौर्णिमेला खडसंगी वन परिक्षेत्रअंतर्गत (बफर) येणाऱ्या निमढेला क्षेत्रात मचानावर असलेल्या कर्मचारी, प्राणी मित्रांना दोन वाघांतील घमासान युद्धाचा आवाज आला. सकाळी सफारीकरिता गेलेल्या पर्यटकांना छोटा मटका जखमी अवस्थेत आढळला. त्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर शोध मोहिमेत ब्रह्मा वाघ मृतावस्थेत आढळून आला. दुसरीकडे या झुंजीत छोटा मटका गंभीर जखमी झाल्याचेही पर्यटकांना दिसून आले. त्याचाही व्हिडीओ समोर आला आहे.
नयनतारा छोटा मटका व भानुसखिंडी यांची मुलगी आहे. ज्या पद्धतीने इतर वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत त्या बातम्या खोट्या असून नयनतारा या वाघिणीसाठी ही झुंज झालेली नाही. तर याच परिक्षेत्रात छोटा मटका याचा संबंध असलेल्या बबली, झरणी या वाघिणीसाठी म्हणून ही झुंज झाली आहे. नयनतारा ही वाघीण कित्येक वेळा सीएमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र, छोटा मटका हा वाघ नाते समजणारा आहे. मात्र या प्राण्यांच्या नात्यांवरतीच डाग लावण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. जे की अगदी चूक आहे. – चेतन वाघमारे, वन्यजीव प्रेमी