Chandrapur News – मद्यधुंद एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; सतर्क नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचांदूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या राजुरा आगाराची बस भीषण अपघातापासून वाचली आहे. सदर बसचा (क्रमांक MH14 MH 5322) चालक दारूच्या नशेत असल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि खाली उतरली. बस डगमगत असल्याचे पाहून प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता, मात्र प्रसंगावधान राखून काही सतर्क प्रवाशांनी तत्काळ बस थांबवल्याने मोठी जीवितहानी टळली. चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी चालकाला जाब विचारला असता, तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. प्रवाशांनी बस जागेवरच रोखून धरत वाहकाकडे दुसऱ्या बसची मागणी केली. “प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा चालकांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.