
एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या बाता केल्या जात असतानाच अजूनही ग्रामीण भागात बारमाही रस्ते नाहीत. नदी नाल्यावर पूल नाहीत. अशा अनास्थेकडे शासनाने दुर्लक्ष केल्यावर कल्पक नागरिक त्यावर कसा उपाय शोधतात, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आलाय. नदीवर पूल नसल्याने शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना पावसाळ्यात सर्वांची ये जा थांबायची. गरजू लोक जीव मुठीत घेऊन जाणे येणे करायचे. पण चिमूरच्या एका युवकाने त्यावर उपाय शोधला. हा देशी जुगाड असला तरी यामुळे लोकांना नदी सुरक्षितपणे पार करता येऊ लागले.
चिमूर शहरातील शुद्ध पेय जलाकरीता उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्यामुळे नदी पात्रात पाण्याचा संचय वाढला. ज्यामुळे माणूसमारी तथा चिचाळा रिठ येथील जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतकऱ्यांना शेती कामाकरिता दहा किलोमीटरचा फेरा घालावा लागे. ही समस्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने स्थानिक आमदार कीर्ती भांगडिया यांनाही सांगण्यात आली. नदीचे पाणी कमी झाल्यानंतर रपटा बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण रपट्याच्या कामाला असलेला वेळ पाहता शेतीची कामे खोळंबू नये, याकरीता युवा शेतकरी प्रवीण चौखे याने सहकाऱ्याच्या मदतीने देशी जुगाड शोधला. नदीपात्राचे अंतर 120 फुट असल्याने तीनशे फुट लांब दोर नदीच्या दोन्ही काठावर बांधला. त्याला चक्री लावली. थर्माकोलचे खोके टिनाच्या चारही बाजूंना बांधून तराफा तयार केला. आणि हा प्रयोग यशस्वी झाला. या तराफ्यातून एकावेळी चार जण नदी पार करू शकतो. या देशी जुगाडचा लाभ या परिसरात शेती असलेले शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यांची रोजची कामे सुरळीत होऊ लागली. सरकारवर अवलंबून राहिले असते तर येथील नागरिकांना आणखी किती काळ वाट बघावी लागली असती, हे सांगणे अवघड आहे. ही कल्पकता नागरिकांचे जीवन सुसह्य करणारी असली तरी ती शासनाला आरसा दाखवणारी आहे.































































