ना ग्रामपंचायतीत, ना नगर परिषदेत नोंद, चंद्रपुरातील सरडपार गावाचा अस्तित्वासाठी संघर्ष

आजचे युग संगणकाचं आहे. जगाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे, जे ऑनलाइन तरं सोडा, ऑफलाइनही सापडत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या या गावाचे नाव आहे सरडपार. शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातशे लोकसंख्या असलेल्या या गावातील नागरिक ग्रामपंचायत अथवा नगर पंचायतीला आम्हाला जोडा, अशी मागणी करीत आहेत. मात्र त्यांचा मागणीकडे अद्यापही गांभीर्याने बघितलं गेलेलं नाही. शासन दरबारी गावाची नोंद नसल्याने गावाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गावकरी संघर्ष करीत आहेत.

चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यात सरडपार गाव येतं. ग्रामपंचायत काग इथं या गावाचा समावेश होता. सोनेगाव, सरडपार या गावाची गट ग्रामपंचायत काग ग्रामपंचायत होती. 2015 मध्ये चिमूर नगर परिषदेची स्थापना झाली. त्यावेळी काग ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. काग, सोनेगाव ही गावे चिमूर नगर परिषदेला जोडण्यात आली. मात्र गावाचे अंतर लांब आहे, असे कारण दाखवून सरडपार गावाला टाळण्यात आले. तेव्हा पासून हे गाव ना ग्रामपंचायतेत आहे, ना नगर परिषदेत.

2015 नंतर या गावाची नोंद मिटली. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील दाखले आणायचे कुठून हा पेच निर्माण झाला होता. अश्यात 2016-17 मध्ये चिमूर तहसीलदारचा पत्रानुसार मिथली ग्रामपंचायतेतून दाखले दिले जात आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत गावाचा थेट सहभाग नाही. 2015 पासून या गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजवलेला नाही. गावाला ग्रामपंचायत नाही. गट ग्रामपंचायतही नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या विकास योजना पासून गाव वंचित आहे. परिणामी गावाचा विकास रखडला आहे. एक तर ग्रामपंचायत द्यावी अथवा एखाद्या ग्रामपंचायतीला गाव जोडावं अशी मागणी आता गावकरी करीत आहेत.