राज्यासह चंद्रपुरात नववी ते बारावीचे वर्ग सुरू, विद्यार्थ्यांचा तुरळक प्रसाद

राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात देखील शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शाळा-कॉलेज व्यवस्थापनाने मुले दाखल होण्याच्या निमित्ताने स्वच्छता- निर्जंतुकीकरण व कोरोना काळातील नियमांचे पालन केले आहे.

राज्य शासनाने अध्यापन सुरू करण्याआधी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात या चाचण्यांत 34 शिक्षक बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात 9 ते 12 वर्गाच्या एकूण 566 शाळा सुरू होणार आहेत. बहुतांश शाळांनी निर्जंतुकीकरण केले आहे. या 4 वर्गांच्या 5 हजार 667 शिक्षकांपैकी 2 हजार 721 शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आज प्रत्यक्ष शाळेत मात्र तुरळक विद्यार्थी दाखल झाले असून चंद्रपूरच्या तुकुम भागातील कला -वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात एका वर्गात पाच ते सहा विद्यार्थ, तर इंग्रजी माध्यमाच्या चांदा पब्लिक स्कुलमध्ये दहावीचे केवळ दोन वर्ग सुरू होते. त्यात एका वर्गात पाच तर दुसऱ्या वर्गात सहा विद्यार्थी उपस्थित होते.

या सर्व विद्यार्थ्यांना पालकांचे हमीपत्र अनिवार्य करण्यात आले असून यात ‘कोरोना काळात आपल्या पाल्याला महाविद्यालयात शिक्षण घेऊ द्यावे, त्याची जबाबदारी आमची राहील’ असे नमूद केले आहे. शाळा कॉलेज व्यवस्थापनांनी एका इयत्तेतील निम्म्या विद्यार्थ्यांना एका सत्रात बोलावले असून, प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडून कॉलेजात पहिल्यांदाच प्रवेश घेतलाय त्यांना नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष वर्गात बसण्याची उत्सुकता होती.

बहुतांश विद्यार्थी कॉलेजचा पहिला दिवस अनुभवण्यासाठी आल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी गेले काही महिने ऑनलाईन अध्यापन फारसे समजत नसल्याची तक्रार देखील केली. आजचा प्रतिसाद बघून आगामी काळात आणखी विद्यार्थी शाळा-कॉलेजात दाखल होतील, अशी शक्यता आहे

आपली प्रतिक्रिया द्या