कोरोना काळात खंड पडलेल्या शिक्षणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने चेतना आणली आहे. विद्यार्थ्यांचे वाचन आणि सोबतच त्यावर आधारित प्रश्नावली व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून राज्यभर दिली जात आहे. चंद्रपूर जिल्हा दुर्गम भागात समजला जात असला तरी या जिल्ह्याने या ‘स्वाध्याय’ नामक उपक्रमात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे
गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभर शालेय शिक्षण या ना त्या कारणाने रखडले आहे. कोरोना काळात हे शिक्षण पूर्णपणे ठप्प होते. अनलॉक प्रक्रियेनंतर या शिक्षणात थोडा सुरळीतपणा येऊ लागला आहे. मात्र पहिली ते दहावी या इयत्ता मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी भक्कम प्रयत्नांची गरज होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नेमका हाच विचार डोळ्यापुढे ठेवत राज्यभर ‘स्वाध्याय’ नामक व्हॉट्सअॅप आधारित प्रश्नमंजुषा तयार केली. ज्या विद्यार्थ्यांना घरी व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा सोडविणे शक्य आहे त्या सर्वांना यात सामावून घेणे शिक्षकांनी शक्य केले. ताज्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीच्या सुमारे 57 हजार विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा उपक्रमात सहभाग घेतला असून राज्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दर शनिवारी आणि रविवारी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा दिली जाते. यात चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी सहभागाचा विक्रमच केला आहे

























































