Video – चंद्रपूर जिल्ह्यात मंदिरे उघडताच चोरी

महाराष्ट्र-तेलंगणातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. हे मोठे मान्यतेचे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात आहे.

देशभरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे मंदिर धार्मिक स्थळे बंद आहेत. केवळ नैमित्तिक पूजा व सणांच्या निमित्ताने होणाऱ्या महापूजेसाठी मंदिरे उघडली जात होती.  कालच राज्य सरकारने नियमांचे पालन करुन मंदिर उघडण्याची परवानगी दिली. त्याचा राज्यभर जल्लोषही झाला.

मात्र आज सकाळी परमहंस संत कोंडय्या महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होणार असल्याच्या निमित्ताने विश्वस्त व भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच त्यांना मंदिराची दानपेटी फोडलेली आढळून आली. हे करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर पोते पांघरले आणि केबल कनेक्शन देखील तोडले.

पहाटेला पूजाअर्चा करण्यासाठी भक्त मंदिरात गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेने धाबा गावात एकच खळबळ उडाली आहे. संस्थानने चोरी झाल्याची तक्रार धाबा पोलीस स्टेशनला नोंदविली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या