
वीज कोसळल्याने चंद्रपूर जिल्ह्यात तीन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यात एक महिलेचा व दोन पुरुषांचा समावेश आहे, जिल्ह्यातील गोंडपिपरी, ब्रम्हपुरी, कोरपना तालुक्यात वीज कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या वेळेस घडली आहे. शेतातून परत येत असताना वीज कोसळल्याने शेतमजूर महिला दगावली तर वनविभागाचा कामावर असलेल्या वनमजुराचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आणि शेतात पिकांना फवारणी करत असताना वीज पडून मृत्यू झाला. गीता पुरुषोत्तम ढोंगे, गोविंदा लिंगा टेकाम तर पुरुषोत्तम परचाके अशी मृतकांची नावे आहेत.
चंद्रपूर शहरात बुधवारी धो धो पाऊस बसरला. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एकच दाणादाण उडाली. सलग दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले. तर जिल्ह्यातील अनेक भागात विजाचा कडकडासह पाऊस झाला. या तीन घटनांनी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज तर उदयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.




























































