
अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचलून नेल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक या गावात घडली. मंदाबाई एकनाथ सिडाम (वय 53) असे त्या महिलेचे नाव असून ही महिला अंगणात खाटेवर झोपली होती. रात्री दोन वाजताचा दरम्यान वाघाने झोपलेल्या मंदा यांच्यावर झेप घेतली. त्यांना ओढत ओढत वाघ जंगलाच्या दिशेने नेत होता. याच दरम्यान काही गावाकऱ्यांनी हे दृश्य बघितलं. त्यांनी आरडाओरड सुरू केला. तो ऐकून इतर गावकऱ्यांनी धाव घेतली.
आवाजामुळे घाबरलेल्या वाघ त्यांना सोडून जंगलात दिशेने पळाला. या हल्ल्यात मंदाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना देण्यात आली. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. वनविभागाने मंदाबाईंच्या परिवाराला 25 हजारांची मदत केली. या घटनेने गावात दहशत पसरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांचा जिल्हा अशी आहे. दरवर्षी वाघ बघण्यासाठी ताडोबात देश विदेशातील लाखो पर्यटक हजेरी लावतात. जिल्ह्यातील वाघांची संख्या सुखावणारी ठरली आहे. ही एक बाजू. दुसरी बाजू मात्र भयावह आहे. जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्षाने अतिशय टोक गाठलं आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बळी चालला आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज आहे.




























































