
>>चंद्रसेन टिळेकर
ग्रामीण भागात हा प्रकार प्रत्ययास येतो. तिथली स्त्री अजूनही वेगवेगळ्या बंधनात आहे. तिच्या कुटुंबातील लोकांकडून तिच्याकडून अनेकदा अवास्तव, अवाजवी अपेक्षा असतात. विशेषत ती जर नववधू असेल तर एक विचित्र गैरसमज असतो तो म्हणजे ती त्या कुटुंबात आल्यानंतर जर काही अनिष्ट घटना घडल्या तर ती पांढऱया पायाची म्हणजे अपशकुनी समजली जाते. मग तिच्या छळाला अंत राहत नाही. या सगळ्या संकटांतून सुटका व्हावी म्हणून ती आपल्या अंगात देव किंवा देवी आल्याचे सोंग करते.
साधारणत रात्रीचे आठ वाजले असावेत. चाळीतल्या व्हरांडय़ात खुर्ची टाकून रस्त्यावरची वर्दळ काहीशा निर्हेतुकपणेच पाहत होतो. घरात जावे म्हणून उठलो तोच कोरसमध्ये गात असलेल्या स्त्रियांच्या गाण्याचा आवाज कानी पडला. निरखून पाहिले तर खाली रस्त्यावर वीस-पंचवीस स्त्रियांचा घोळका गाणे म्हणत जात असल्याचे दिसले.
काहीजणींच्या हातात घागरी होत्या आणि त्या घागरीत तोंड घालून “फु…फु…” असा तोंडाने आवाज करीत होत्या. काय प्रकार हे मला कळेना. कारण गिरगावला राहायला येण्यापूर्वी मी भायखळ्यासारख्या गिरणगावात राहत होतो. तिथे असले कधी मी पाहिले नव्हते. म्हणून मी सौभाग्यवतीला हाक मारली. ती म्हणाली, “अहो, आज नवरात्रातली अष्टमी आहे ना, आज काही स्त्रियांच्या अंगात देवी संचार करते.”
“देवी अंगात येते? तुझा विश्वास आहे असल्या गोष्टींवर?”
“माझ्या विश्वासाचा काय संबंध? त्यांचा विश्वास आहे ना? आपण कशाला कोणाच्या श्रद्धेच्या आड यायचं? आणि त्या बिचाऱया कोणाला त्रास देत नाहीत.” मला मात्र हे समर्थन पटलं नाही. कारण माझा यासंबंधातला अभ्यास काही वेगळेच सांगत होता.
“ या अशा कुठपर्यंत जाणार आहेत?”
“अहो, पुढच्या गल्लीत देवीचं देऊळ आहे ना, तिथे याची सांगता होईल.”
“आलोच मी तासाभरात” असे म्हणून मी त्या देवळाकडे कूच केली. एव्हाना त्या स्त्रियांनी गोल रिंगण करून त्यात त्या गोलाकार फिरू लागल्या होत्या. मंदिर स्त्रियांनी गच्च भरले होते. इथे एक वेगळेच दृश्य पहायला मिळाले. अंगात आलेल्या स्त्रिया, ज्या अधिकतर प्रौढवयीन होत्या, त्या गोलाकार फिरत होत्या आणि त्यांच्या वर्तुळाभोवती गर्दी करून राहिलेल्या स्त्रिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी धडपडत होत्या. अंगात आलेल्या आणि त्यांना प्रश्न विचारणाऱया स्त्रिया या सुशिक्षित मध्यमवर्गातल्याच होत्या. प्रश्नही नेहमीचे कौटुंबिक स्वरूपाचेच होते. म्हणजे माझ्या मुलाला नोकरी कधी लागेल, मुलीचे लग्न कधी होईल, आमच्या घरात सुखशांती लाभत नाही, तेव्हा कोणी आमच्या वाईटावर आहे का… इत्यादी इत्यादी. अंगात आलेल्या (किंवा आणले गेलेल्या) त्या प्रौढ बायकाही तोंडाला येईल ते बोलत होत्या. कुठलेही ठोस असे उत्तर किंवा समाधान होईल असे काही त्या सांगत नव्हत्या. शेवटी मीही कंटाळून घरी परतलो. पण माझ्या डोक्यातील विचारचक्र काही थांबेना. खरं तर असे हे अंगात येणे ग्रामीण भागात अजूनही मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. अगदी माझ्या देहू गावातील परिसरातही असे प्रकार अधूनमधून बघायला मिळतात. तिथे संध्याकाळी देवळातल्या घंटा मोठय़ाने वाजायला लागल्या की, देवळात हजर असलेल्या काही बायकांच्या अंगात यायला लागायचे. ‘अंनिस’सारख्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांमुळे हे प्रमाण आता कमी होत असले तरी गाणगापूर, तुळजापूर इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मात्र हे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की, ग्रामीण भागात अजूनही धार्मिकतेमुळे म्हणा किंवा शिक्षणाच्या अभावी म्हणा, अंगात येणे या प्रकारावर विश्वास बसणे आपण समजू शकतो, पण शहरी भागात आणि तेही सुशिक्षित समाजात अशा अंधश्रद्धांना थारा कसा दिला जातो? भलेही अंधश्रद्धा इतरांना निरुपद्रवी असेल, पण शेवटी आहे ती एक अंधश्रद्धाच ना? खुद्द त्या स्त्राrला ती घातक ठरू शकते याचा कुणी विचार करताना दिसत नाही. देव, देवी किंवा एखादा साधू पुरुष आपल्या अंगात येतो अशी श्रद्धा बाळगणे ही एक मनोविकाराचीच समस्या आहे आणि म्हणून तिच्यावर मानसशास्त्राrय डॉक्टरकडे जाऊन वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा अशा व्यक्तीला पुढे वाटेल ते भास होऊ लागतात. अगदी देवळात गेल्यावर काही वेळ घंटानाद ऐकल्यावर समोरच्या मूर्तीतला देव आपल्याशी हसतोय, आपल्याला खुणावतोय असाही भास होतो. वेडेपणाची ही पहिली पायरी असू शकते. तेव्हा या प्रकाराकडे केवळ निरुपद्रवी अंधश्रद्धा म्हणून पाहणे धोक्याचे ठरू शकते.
ग्रामीण भागात हा प्रकार प्रत्ययास येतो त्याला एक वेगळेच परिमाण आहे आणि ते काहीसे कारुण्यमयही आहे. तिथली स्त्री अजूनही वेगवेगळ्या बंधनात आहे. तिच्या कुटुंबातील लोकांकडून तिच्याकडून अनेकदा अवास्तव, अवाजवी अपेक्षा असतात. उदा. लग्न झाल्याबरोबर एका वर्षात वंशाला दिवा दिलाच पाहिजे, दर सणासुदीला तिच्या माहेराकडून काहीतरी धनदौलत तिने आणलीच पाहिजे, या आणि अशा अनेक गोष्टींची पूर्तता तिला करावी लागते. विशेषत ती जर नववधू असेल तर एक विचित्र गैरसमज असतो व तो म्हणजे ती त्या कुटुंबात आल्यानंतर जर काही अनिष्ट घटना घडल्या तर ती पांढऱया पायाची म्हणजे अपशकुनी समजली जाते. मग तिच्या छळाला अंत राहत नाही. या सगळ्या संकटांतून सुटका व्हावी म्हणून ती आपल्या अंगात देव किंवा देवी आल्याचे सोंग करते. कारण तिला आतापर्यंतच्या अनुभवातून हे ज्ञात झालेले असते की, ज्या स्त्रीच्या अंगात येते तिच्या कुटुंबाकडून देवाच्या भीतीमुळे तिचा छळ थांबवला जातो. तेव्हा अशा अंगात येण्याचा मनोविकाराशी संबंध नसून तो एक सामाजिक प्रश्न आहे. शहरी संस्कृतीतील सुशिक्षित समाजाने केवळ परंपरा म्हणून विशिष्ट दिवशी ‘अंगात येणे’सारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार चालू ठेवावा का? एका अंधश्रद्धेतून दुसऱ्या अंधश्रद्धेला जन्म देण्याचा धोका नेहमीच संभवतो. म्हणून एखादी अंधश्रद्धा किंवा निष्फळ परंपरा केवळ ती निरुपद्रवी आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे हानीकारक आहे. शिवाय ग्रामीण जनता नेहमीच शहरी लोकांच्या जीवन पद्धतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आपल्याला हा अंधश्रद्धेचा खेळ खेळता येणार नाही याचे भान शहरी सुशिक्षितांनी ठेवलेच पाहिजे.
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)





























































