
ख्रिस्ती नववर्ष सुरू होण्यास आता अवघे काही दिवस बाकी आहेत. नववर्षात जानेवारी 2020 पासून अनेक बदल होणार असून याचा थेट प्रभाव सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. यातील काही नियमांमुळे तुम्हाला दिलासा मिळणार आहे, तर काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. नववर्षात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत, आधार-पॅनकार्ड लिंक, एसबीआय डेबीट कार्ड यासह काही सरकारी योजनांमध्ये बदल होणार आहेत.
पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा…

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मूदत देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने 31 मार्चला जारी केलेल्या अधिसुचनेनुसार जर तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधारकार्ड असेल तर दोन्ही एकमेकांशी लिंक करणे अनिवार्य आहे. उच्च न्यायालयाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे. जर तुम्ही अद्यापही पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर सावध व्हा. कारण आयकर विभागाच्या आदेशानुसार 1 जानेवारीपासून पॅन कार्ड आधारशी लिंक करता येणार नाही, त्यामुळे ते निश्क्रिय होईल.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होणार

1 जानेवारी 2020 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल करण्यात येणार आहे. याआधी सलग 4 महिने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून नववर्षातही सामान्य लोकांना भाववाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे. गॅस वितरण करण्याऱ्या कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सिलिंडरच्या किंमतींचा अंदाज घेते आणि यात बदल करते. डिसेंबर 2019 मध्ये देखील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 13 ते 18 रुपयांनी वाढल्या होत्या.
एसबीआयचे डेबीट कार्ड बंद होणार

31 डिसेंबरनंतर देशात अनेक डेबीट कार्ड बंद होण्याची शक्यता असून यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या खातेधरकांना याबाबत अलर्टही केले आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नेटिक स्ट्राईप डेबीट कार्ड बंद करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2020 पासून फक्त ईएमव्ही चिप आणि पिन वाले कार्ड वापरात येतील. आरबीआयच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
‘ही’ सरकारी योजना होणार बंद

देशात अनेक सरकारी योजना सुरू असून याचा कोट्यवधी लोकांना फायदाही होतआहे. परंतु पुढील वर्षापासून यातील एक सरकारी योजना बंद होणार आहे. ‘सबका विश्वास स्कीम’ बंद होणार असून तुम्हाला याचा लाभ मिळवायचा असेल तर आताच नोंदणी करू शकता. नववर्षांमध्ये तुम्ही याचा लाभ उठवू शकणार नाही.
… तर पाच हजार वाचवू शकता

जर तुम्ही अजूनही आयकर रिटर्न भरला नसेल तर आताच भरून टाका, अन्यथा तुम्हाला पाच हजारांचा दंड होऊ शकतो. 31 डिसेंबरपूर्वी आयकर रिटर्न भरून तुम्ही पाच हजार रुपये वाचवू शकता. कारण 2018-19 वर्षाचा आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती. 31 ऑगस्टपर्यंत ज्या लोकांनी आयकर भरला नाही त्यांना पाच हजार दंडासह 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरण्याची मूदत देण्यात आली. जर तुम्ही या कालावधीत देखील आयकर भरला नाही व 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020 मध्ये आयकर भरल्यास तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वीच आयकर भरा आणि पाच हजार रुपये वाचवा.

























































