हिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये 2011 साली लॉर्डस् येथे झालेली कसोटी फिक्स होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2011 ते 2012 दरम्यान जवळपास 15 सामन्यांत किमान 24 केळा स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा अल जजिरा या वृत्तवाहिनीने केला आहे. ‘क्रिकेट मॅच फिक्सर्स – द मुनव्वर फाइल्स’ या लघुपटात करण्यात आलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट कर्तुळात खळबळ उडाली आहे.

आयसीसीच्या रडारवर असलेल्या अनिल मुनव्वर या फिक्सरची चौकशी केली असता त्यातून ही माहिती समोर आली आहे. मुनव्वरने 6 कसोटी, 6 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामन्यात फिक्सिंग केली होती. या लघुपटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर फिक्सिंगचे आरोप करण्यात आले आहेत.

‘आयसीसी’ने घेतली दखल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ‘आयसीसी’च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे महाव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल म्हणाले की, ‘संबंधित वृत्तवाहिनीने इंटरपोल किंवा अन्य पोलीस यंत्रणांच्या मदतीने हे चित्रण आम्हाला दिले, तर दोषींवर कारवाई करण्यात मदत होईल.

‘आयसीसी’च्या रडारवर असलेल्या अनिल मुनव्वरने 2011 साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यातही फिक्संग झाल्याचे सांगितले आहे. या मुनव्वरबरोबर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांचे संबंध असल्याचेही पुढे आले आहे.

हिंदुस्थानने जिंकलेल्या विश्वचषकातील काही सामन्यांत फिक्सिंग?
अल जजिरा वृत्तवाहिनीने 54 मिनिटांचा हा लघुपट बनवला आहे. यामध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी 7 सामन्यांत, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 5 सामन्यांत, पाकिस्तानच्या खेळाडूंनी 3 सामन्यात, तर आणखी एका सामन्यात इतर देशांच्या क्रिकेटपटूने स्पॉट फिक्सिंग केल्याचे सांगण्यात आले आहे. 2011 साली हिंदुस्थानी उपखंडात झालेल्या आणि यजमान हिंदुस्थानने जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेतील 5 आणि 2012 साली श्रीलंकेत झालेल्या टी-20 विश्वचषकातील 3 सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचेही या लघुपटात म्हटले आहे. यात हिंदुस्थानमध्ये झालेल्या तीन सामन्यांत फिक्सिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेळातील ठरावीक ठिकाणी निकालनिश्चिती करण्यात आली असून त्याचा सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही असा खुलासाही या वृत्तवाहिनीने केला आहे.

दोन्ही बोर्डाने आरोप फेटाळले
अल जजिरा वृत्तवाहिनीने लघुपटाच्या माध्यमातून आपल्या क्रिकेटपटूंवर केलेले स्पॉट फिक्सिंगचे आरोप इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळले आहेत. या वृत्तवाहिनीने रविवारी दाखविलेल्या लघुपटात अगदीच त्रोटक माहिती आहे. त्यावर क्रिकेटपटूंनी फिक्सिंग केले असे थेट स्पष्ट होत नाही. हे स्टिंग ऑपरेशन अतिशय मर्यादित स्वरूपाचे आहे. यात कुठल्याही क्रिकेटपटूच्या नावाचा उल्लेख आलेला नाही. आमचा आमच्या आजी-माजी खेळाडूंवर विश्वास आहे, असेही दोन्ही क्रिकेट बोर्डांनी स्पष्ट केले. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथ यांच्यावर कारवाई करून शिस्तीच्या बाबतीत किती कडक आहोत हे आम्ही क्रिकेटविश्वाला दाखवून दिले आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितले.

summary- channel claims match fixing in cricket