एसटीमध्ये तिकिटांचा गोलमाल! 15 लाख रुपयांच्या तिकिटांचा हिशोब लागेना, अमरावती आगारातील 11 अधिकारी-कर्मचारी निलंबित

कोरोना महामारीपासून आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया सर्वसामान्यांच्या एसटीमध्ये तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या तिकिटांचा गोलमाल झाल्याचे समोर आले आहे. अमरावती-1 आगाराला एप्रिल 2018 ते एप्रिल 2023 या काळात दिलेल्या तिकिटांच्या साठय़ात तफावत आढळून आली आहे. सदरच्या तिकिटांचा हिशोबच लागत नसल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत सदर आगारातील 11 अधिकारी-कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

एसटीच्या वाहकाकडे सध्या तिकिटाच्या मशीन दिल्या आहेत. सदर मशीनच्या माध्यमातून वाहक प्रवाशांना तिकीट देत असून त्याची वेळोवेळी मुख्य सर्व्हरला नोंद होते. मात्र सदरच्या मशीनमध्ये कधी बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाकडून प्रत्येक वाहकाला पारंपरिक कागदी पंचिंगची तिकिटे दिली जातात. त्यांना त्याचा वेळोवेळी आपल्या आगारात हिशोब द्यावा लागतो. अमरावती-1 या आगाराला 2018 पासून 34 लाख किमतीच्या तिकिटांचा साठा देण्यात आला आहे. त्यापैकी 19 लाख 65 हजार रुपये किमतीच्या तिकिटांचा हिशोब लागत असला तरी उर्वरित 15 लाख 45 हजार रुपये किमतीची तिकिटे नाहीत. त्यामुळे गायब झालेल्या तिकिटांचा शोध घेण्यासाठी एसटीच्या अमरावती विभागीय कार्यालय स्तरावर समिती नेमली होती. त्यामध्ये वाहतूक अधीक्षक शैलेश गवई, आगार लेखाकार अभिषेक गुल्हाने, वाहतूक नियंत्रक असलम खान, ज. आ. चव्हाण यांच्यासह 11 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करत त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.