
चर्नी रोड स्थानकातून गिरगावच्या दिशेने जाणार्या फूटओव्हर ब्रिजचे काम सुमारे तीन वर्षे रखडले आहे. आता तर काम ठप्प झाले की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कारण ना कामाची ना कसली हालचाल ना आवाज. जो काही ठाकूरद्वारच्या दिशेला जाणारा पुलाचा लहानसा भाग तयार झालाय तेवढाच. त्यापुढे काम सरकणार का? एकसंध पूल गिरगावकरांना मिळून रोजची जीवघेणी क्रॉसिंग आणि ट्रेन पकडण्यासाठी फलाट तुडवण्याचा हेलपाटा थांबणार का, असा संतप्त सवाल गिरगावकर करीत आहेत. पुलाच्या कामाची अशी अर्धवट स्थिती असताना येत्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण होईल असा दावा महापालिका करीत आहे.
चर्नी रोड स्थानक पूर्वेला 340 ते 360 मीटरचा फूटओव्हर ब्रिज आहे. गिरगावकर प्रवाशांसाठी हा पूल म्हणजे मोठा आधारच होता. हा पूल धोकादायक ठरवून तो नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात आले, पण हे काम चांगलेच रखडले. वारंवार टीका झाल्यानंतर, प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर ठाकूरद्वारच्या दिशेने जाणार्या पुलाच्या एका टप्प्याचे बांधकाम पूर्ण करून तो काही महिन्यांपूर्वी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र त्यामुळे प्रवाशांचा त्रास काही कमी झाला नाही. पुलावरून ठाकूरद्वार दिशेच्या प्रवाशांना फलाट क्रमांक 2/3 आणि फलाट क्रमांक 4 गाठता येते, मात्र फलाट क्रमांक 1 वर पोहचण्याचा प्रश्न आहेच. फलाट क्रमांक 1 गाठायचे म्हणजे अख्खा फलाट क्रमांक 2/3 चालून विरुद्ध दिशेला पोचायचे. त्यातच फलाटावरून चालताना दोन्ही दिशेच्या ट्रेन आल्या की वांदेच. एवढा त्रास कमी होता की काय, काही महिन्यांपूर्वी धोकादायक ठरवून सैफी रुग्णालयाच्या दिशेने उतरणार पूलही बंद केलाय.
कसे चाललेय काम
चर्नी रोडचा पादचारी पूल सर्वात मोठा सुमारे 340 ते 360 मीटर लांबीचा आहे. त्याचे तीन टप्प्यांत काम सुरू आहे. त्यापैकी फक्त तिसर्या टप्प्याचे म्हणजे ठाकूरद्वारच्या दिशेने जाणार्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र सैफी रुग्णालयाच्या दिशेचा पूल आणि पुलाचा मधला लांबलचक भाग रखडला आहे.
महापालिका काय सांगते?
तिसर्या टप्प्यात म्हणजे सैफी रुग्णालयाच्या बाजूने उतरणार्या पुलाचे गर्डर लावून झाले आहेत. स्लॅब आणि बाजूला बॅरिकेडस् लावल्या की काम पूर्ण होईल.
मधला टप्पा 2 मोठा आहे. त्यामध्ये फाऊंडेशनचे काम जवळजवळ पूर्ण झालेय. फक्त एक पिलर बसवायचा आहे. तो बनवताना रेल्वेचा एक ‘एंट्रन्स’ मध्ये येत असल्यामुळे ते काम बरेच महिने रखडले. हा एंट्रन्स पालिकेने शिफ्ट केला असून त्यावर आता पिलर बसवू शकतो. त्यानंतर मधल्या भागाच्या गर्डरचे काम सुरू होईल. पाइल फाऊंडेशन करताना जमिनीच्या खाली 3200 केव्हीच्या केबल लागल्या. त्या हटवायला खूप कालावधी गेला. त्यानंतर फाऊंडेशनचे काम सुरू झाले. स्टीलचे गर्डर हैदराबाद येथे तयार करून मुंबईत आणले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पुलाचे काम सुरू आहे. 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होऊन पूल प्रवाशांसाठी खुला होईल.




























































