
सामना ऑनलाईन । मुंबई
घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी एक खासगी विमान कोसळलं. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल होऊ लागले. विशेष म्हणजे आज या विमानाची ट्रायल रन होती, म्हणून सकाळी विमानाची पूजा करून मिठाई वाटण्यात आली होती. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि विमानाचा अपघात झाला.
Exclusive Video : घाटकोपरमध्ये विमान कोसळलं
विमान उड्डाणापूर्वीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उड्डाणापूर्वी विमानाची पूजा करण्यात आली होती. तसेच नारळ फोडून मिठाईही वाटण्यात आली होती. परंतु दुपारी ट्रायल रनवेळी विमान कोसळलं आणि पाच जणांना जीव गमवावा लागला.
मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात खासगी विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये विमानातील पायलट, को-पायलट, विमान तंत्रज्ञ, टेक्निशियन आणि एका रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाची बाब म्हणूजे हे उत्तर प्रदेश सरकारच्या ताफ्यातील विमान होते. विमानाच्या शेपटाकडील भागावर उत्तर प्रदेश सरकारचा लोगो देखील होता. या आधी एकदा या विमानाचा छोटा अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान राज्य सरकारनं विकलं होतं.

























































