
बिटकॉईन दुप्पट करून देतो असे म्हणून दोन बिटकॉईन घेऊन मित्रानेच फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय उर्फ संजू लक्ष्मण अवघडे (रा. पांडवनगर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लक्ष्मण कारी (रा.बालाजीनगर, धनकवडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
अर्जुन व संजय यांची मैत्री असून 2005 पासून त्यांची ओळख आहे. अर्जुन यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांनी 2015 मध्ये दोन बिटकॉईन खरेदी केले होते. संजय हा ऑनलाईन ट्रेडींग करत असतो. त्याने अर्जुन यांना तुझ्या दोन बिटकाईनचे एका महिन्यात चार बिटकॉईन करून देण्याचे आमिष दाखविले. मित्र असल्यामुळे विश्वास ठेवत त्यांनी आरोपीच्या वॉलेटवर दोन बिटकॉईन जमा केले. त्यानंतर आरोपीने त्यांना दोनचे चार बिटकॉईन करून दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी आपण दिलेले दोन बिटकॉईन परत मागितले. मात्र, त्याने बिटकॉईनही दिले नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पडवळ तपास करत आहेत.






















































