चेक बाऊन्स करणारा वकील गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी एका वकिलाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनाविली आहे. तसेच मुदतीत पैसे परत न केल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.

दशरथ रामचंद्र घोरपडे (वय ४५) असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सरफराज अहमद शेख यांनी फिर्याद दिली होती. शेख हे हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. शेख आणि घोरपडे हे चांगले मित्र होते. घोरपडे हे वकील असून, त्यांचा सातारा रस्त्यावर रिअल इस्टेट व टुरिस्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. स्थावर मिळकतीसंदर्भात व्यवहार न झाल्यास दिलेल्या पैशांवर १२ टक्क्यांप्रमाणे व्याज देण्याचे घोरपडे यांनी शेख यांना सांगितले.

त्यानुसार डिसेंबर २००४ मध्ये शेख यांनी ९ लाख रुपये गुंतवले. मात्र, घोरपडे यांचा सांगितल्याप्रमाणे स्थावर मिळकतीसंदर्भात कोणताही व्यवहार झाला नाही. त्यामुळे परतावा म्हणून शेख यांना १२ टक्के दराने व्याज परत केले. मात्र २००९ पासून घोरपडे यांनी अचानक परतावा देण्याचे थांबवले. शेख यांनी सतत पैशांची मागणी केल्याने त्यांना तीन लाखांचे तीन चेक देण्यात आले. मात्र, ते बाऊन्स झाले. त्यानंतर पुन्हा ३ लाख २० हजार रुपयांचे तीन चेक देण्यात आले होते. तेही वटले नाहीत. मार्च २०११ मध्ये शेख यांनी दिलेली मुद्दल आणि त्यावरील व्याज असे मिळून घोरपडे यांनी पुन्हा १२ लाख ७१ हजार ३६९ रुपयांचे दोन चेक दिले होते. त्यामुळे दिलेले चेक वटत नसल्याप्रकरणी शेख यांनी घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती.