परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ऑनलाइन तपासा – युवासेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीसाठी उच्च शिक्षणासाठी जायचे असेल तर त्यांना आपली पदवीची गुणपत्रिकेची तपासणी करणे म्हणजे ट्रान्सक्रिप्ट करणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपासणी ऑनलाइन करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

जागतिक धोरणानुसार कोणत्याही देशाच्या विद्यार्थ्यास उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी आपली पदवी ट्रान्सक्रिप्ट करून तपासणी करण्याचे मुख्य काम वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस (डब्ल्यूईएस) ही जागतिक संस्था करते. मुंबई विद्यापीठातून गुणपत्रिका ट्रान्सक्रिप्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना डब्ल्यूईएसकडे परदेशात कुरीयरमार्फत पाठवावे लागते. त्यानंतर डब्ल्यूईएस ही संस्था त्यांच्याकडे आलेल्या गुणपत्रिका पुन्हा संबंधित विद्यापीठाकडे री-व्हेरिफिकेशनसाठी पाठवतात. त्यानंतर डब्ल्यूईएसला पुन्हा सत्यता अहवाल देतात.

सध्या विद्यार्थ्यांना नोकरी किंवा उच्च शिक्षणसाठी ट्रान्सक्रिप्ट प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 20 दिवस ते 1 महिना लागतो. मुंबई विद्यापीठाचा पदवीधर हा बाहेरगावी स्थायिक असेल तर त्यास या प्रोसेससाठी स्वतः विद्यापीठात यावे लागते आणि ट्रान्सक्रिप्ट पूर्ण करावी लागते. ही बाब खूप खर्चिक आहे. या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपासणी ऑनलाइन करा अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी युवासेनेतर्फे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरूखकर, वैभव थोरात आदी उपस्थित होते.

पदवीधर विद्यार्थ्यास ट्रान्सक्रिप्ट परदेशात डब्ल्यूईएसकडे पाठविण्याचा कालावधी सात दिवसांत पूर्ण होईल. ऑनलाइन पद्धतीमुळे एक महिन्याचा लागणारा कालावधी आता सात दिवसांत पूर्ण होणार आहे.

विद्यार्थ्यांस वारंवार होणारा कुरीयर आणि इतर खर्च कमी होणार आहे. त्याऐवजी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून ऑनलाइनसाठी कमीत कमी शुल्क आकारावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे.