सामाजिक न्याय विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी, चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात बनावट देयकांद्वारे घोटाळा; माहिती अधिकाराखाली उघड

सामाजिक न्याय विभागालाही भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे समोर आले आहे. या विभागातील अधिकारी खोटी बिले सादर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निधीची लूट करत आहेत. हळूहळू या घोटाळ्याची व्याप्ती कोटय़वधींच्या घरात जाण्याची शक्यता असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनने माहिती अधिकाराखाली हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.

वसतिगृहातील गृहपाल कुंदन कोळवते यांनी गृहपालपदाचा पदभार स्वीकारल्यापासून एकही पालक सभा घेतलेली नाही किंवा विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांना भेटी दिल्या नाहीत. माहिती अधिकारांतर्गत याबाबतची माहिती मागवली असता कोळवते यांनी खोटी माहिती, बनावट देयके सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

असा झाला भ्रष्टाचार

कोळवते यांनी दोन वेळा पालक सभा आयोजित केल्याचे सांगून खर्चाचा तपशील दिला. त्यात स्टेज, मंडप, नाश्ता, शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड येथून 12 ऑक्टोबर 2024 रोजी पुस्तके खरेदी केल्याचे देयक सादर केले. या देयकाची उलट तपासणी करताना शासकीय मुद्रणालयाला 12 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने कोणत्याही पुस्तकांची विक्री झाली नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आली तर नाश्ता मागविलेल्या दुकानात चौकशी केली असता देयके बनावट असल्याचे सांगण्यात आले. या आर्थिक घोटाळ्याला गृहपाल कुंदन कोळवते आणि देयके मंजूर करणारे गृहप्रमुख सविता वळवी तसेच सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, मुंबई उपनगर हेदेखील जबाबदार असून त्यांची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनने केली आहे.