मला भगवा रंग लावला जातोय, पण भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही -रजनीकांत

1144

तमीळ कवी आणि संत तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याला भाजप नेत्यांकडून भगवी वस्त्र परिधान करण्यात आल्यानंतर तामीळनाडूतील राजकारण आणखी तापले आहे. आता तमीळ सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपल्याला आणि तिरुवल्लुवर यांना भगवा रंग लावण्याचा प्रयत्न करतेय, पण आम्ही दोघेही भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?
गेल्या आठवडय़ात बँकॉक दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामीळ कवी तिरुवल्लुवर यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यानंतर तिरुवल्लुवर यांचे भगवी वस्त्र परिधान केलेले छायाचित्र तामीळनाडूतील भाजप नेत्याने ट्विट केले होते. यावरून भाजप आणि स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील डीएमके यांच्यात वाद निर्माण झाला होता. भगवीकरणासाठी संबंधित या विवादात रजनीकांत यांनीही उडी घेऊन आपल्याला भगवा रंग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रजनीकांत यांनी केला.
कुठल्या पक्षात जायचे हे मी स्वतः ठरवेन. माझे उगाचच भगवेकरण केले जातेय असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. तामीळनाडूत 2021 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी मांडलेली आपली भूमिका भाजपसाठी चिंतेचे वातवरण निर्माण करू शकते अशी सर्वत्र चर्चा आहे.

अयोध्याप्रकरणी येणाऱया निर्णयाचा सन्मान करा
अयोध्या प्रकरणावर कुठलाही निर्णय येऊ द्या. त्या निर्णयाचा प्रत्येकाने सन्मान करावा आणि देशात शांतता राखावी असे आवाहन रजनीकांत यांनी केले आहे. अयोध्याप्रकरणी येत्या 17 नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही दिवशी अंतिम निर्णय येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या सर्व राज्यांमध्ये हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या