महाराष्ट्राला गरज कोचेस अन् ऍकॅडमीची, रवींद्र डोंगरे यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व लॉकडाऊनमध्ये कॅरम व बुद्धिबळ हे दोन खेळ बहुतांशी प्रमाणात घराघरांमध्ये खेळले गेले. त्यामुळे आपसूकच बुद्धिबळ या खेळाबद्दल जाणून घ्यावेसे वाटले. मुंबई शहर, उपनगर, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी हा खेळ खेळला जात आहे. या खेळाच्या आंतरशालेय स्पर्धाही होताहेत. या खेळाचा प्रसार, प्रचारही होत आहे. मात्र तरीही महाराष्ट्र व राज्यातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी अव्वल दर्जाचे कोचेस व ऍकॅडमीची नितांत गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे आशियाई विभाग 3.7चे अध्यक्ष व जागतिक संघटना एथिक्स कमिशनचे सदस्य रवींद्र डोंगरे यांनी. याप्रसंगी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी बुद्धिबळाशी निगडित विषयांवर दृष्टिक्षेप टाकला.

सर्व स्पर्धांवर पाणी फेरले
बुद्धिबळ हा खेळ मोठय़ा स्टेडियममध्ये खेळला जात नाही तसेच हजारोंच्या संख्येने प्रेक्षकही हा खेळ बघण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे कॅरमसह बुद्धिबळही कोरोनाच्या काळात घरबसल्या खेळला गेला, पण या खेळाच्या स्पर्धा मात्र झाल्या नाहीत. मॉस्को येथे ऑगस्ट महिन्यात जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धा होणार होती. त्यामध्ये 190 देशांतील जवळपास दोन हजार खेळाडू सहभागी होतात. ही स्पर्धा झाली नाही तसेच हिंदुस्थानातील राष्ट्रीय, मुंबईतील महापौर, आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर या स्पर्धाही झाल्या नाहीत अशी खंत रवींद्र डोंगरे यांनी व्यक्त केली.

तामीळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर
बुद्धिबळ या खेळामध्ये महाराष्ट्र चांगली कामगिरी करीत आहे. बुद्धिबळ या खेळाचा विचार करता देशामध्ये तामीळनाडूनंतर महाराष्ट्राचाच क्रमांक लागतो. राष्ट्रीय स्पर्धांवर नजर टाकल्यास महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करताना प्रकर्षाने दिसून येतात. महाराष्ट्रात जवळपास 40 खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील मुलेही हा खेळ खेळताना दिसत आहेत. 35 ते 40 जिह्यांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, ओएनजीसी, रेल्वे यांसारख्या ठिकाणी बुद्धिबळपटूंना नोकरीही मिळत आहे अशी माहिती रवींद्र डोंगरे यांनी यावेळी दिली.

ऑनलाइन स्पर्धेत तीन लाखांचे बक्षीस
बुद्धिबळ हा खेळ खरे तर ऑनलाइनही चांगल्या प्रकारे खेळला जातो. त्यामुळे कोरोना व लॉकडाऊनमध्ये बुद्धिबळपटू या खेळाशी कनेक्टेड राहावे यासाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ऑल मराठी बुद्धिबळ संघटनेकडून जगातील सर्वात मोठय़ा ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तीन लाखांची बक्षिसेही देण्यात आली. त्यानंतर देशातील विविध संघटनांनी कमीत कमी बक्षीसांची आणि कमीत कमी प्रवेश फी असलेल्या ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन केले. ऑनलाइन स्पर्धांना दणदणीत प्रतिसाद लाभला, असे रवींद्र डोंगरे पुढे सांगतात.

ग्रॅण्डमास्टर होणे कठीण, तरीही…
फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेचे नियम खूप कठीण आहेत. त्यामुळे ग्रॅण्डमास्टर होणे कठीण बाब आहे. खेळाडूला ग्रॅण्डमास्टरसाठी 2500 एलो रेटिंग आणि तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एक विशिष्ट कामगिरी करावी लागते. तरीही महाराष्ट्रासह देशातूनही एकापेक्षा एक ग्रॅण्डमास्टर घडले. प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, शार्दूल घागरे, विदीत गुजराथी, अक्षराज कोरे, स्वप्नील धोपाडे, रौनक साधवानी हे पुरुष खेळाडू ग्रॅण्डमास्टर बनले, तसेच स्वाती घाटे, सौम्या स्वामिनाथन या महिला ग्रॅण्डमास्टर बनल्या. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखची या खेळातील प्रगती लक्षणीय असल्याचे रवींद्र डोंगरे यांनी सांगितले.