टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण, संजय गांधी रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचे माजी सलामीवीर खेळाडू चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा आणि माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंह यांनी ट्विट करून याची माहिती दिली. शुक्रवारी त्यांच्या घशातील लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. शनिवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लखनौ येथील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेतन चौहान आमदार असून उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. नौगादा सादात मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आकाश चोप्रा आणि आर.पी. सिंह यांनी ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना केली.

40 कसोटीत 2 हजार 84 धावा
चेतन चौहान यांनी टीम इंडियाकडून 1969 ते 1978 या काळात 40 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 31.54 च्या सरासरीने 2 हजार 84 धावा काढल्या. 97 ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहे. तसेच 7 एक दिवसीय लढतीत त्यांच्या नावावर 153 धावांची नोंद आहे. 70 च्या दशकात लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामीला येऊन चेतन यांनी 10 शतकीय भागीदाऱ्या केल्या आणि 3 हजारहून अधिक धावाही काढल्या.

images-16

अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोना
जगातील अनेक दिग्गज खेळाडूंना याआधी कोरोना झाला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा माजी कर्णधार मुशरफे मोर्तझा, तसेच पाकिस्तानच्या संघातील 10 खेळाडू आणि जगातील नंबर वन टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या