ठसा – छगन चौगुले

725

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

खंडेरायाच्या लग्नाला। बानू नवरी नटली।
नवरी नटली। काल बाई सुपारी फुटली।।

या खंडोबा गीताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे प्रख्यात लोकगायक छगन चौगुले यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात जागरण, गोंधळ, भारुड अशा विधी नाटय़ांच्या विधी गीतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि खंडोबाची 11 ठाणी यांना मराठी लोकमानसात, लोकधर्मात विशेष स्थान असून देवींचे माहात्म्य आणि खंडोबा, भैरवनाथ या क्षेत्रपाल देवांचे माहात्म्य छगन चौगुले यांनी आपल्या संपूर्ण कलाजीवनात लोकसंगीताद्वारे सादर केले. कॅसेट्च्या माध्यमातून त्यांनी देवी-देवतांचा महिमा घरोघर पोहोचविला. पारंपरिक नाथ डौरी गोसावी समाजाच्या नातेपुतेजवळील कारंडे गावचे छगन चौगुले मुंबईत आले. घोडपदेव, डी. पी. वाडी, भायखळा येथील प्रख्यात वाघ्येशाहीर शंकरराव धामणीकर यांच्या पारंपरिक जागरण, गोंधळाच्या संचात त्यांनी काही वर्षे गायनाचे काम केले. ते सिद्धहस्त गीतकार होते. हा वारसा त्यांनी शंकरराव धामणीकर यांच्याकडून घेतला. 1970-80च्या दशकात अनेक लोककलावंतांच्या लोकगीतांच्या कॅसेट्स प्रकाशित होत. विंग्ज, सरगम, टीप्स, कुणाल, व्हिनस अशा अनेक कंपन्या त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतात होत्या. विंग्ज कंपनीने छगन चौगुले यांच्या बहुतांश कॅसेट्स प्रसिद्ध केल्या. स्वत: उत्तम गीतकार, हार्मोनियम वादक, खंजिरीवादक आणि गायक असलेल्या छगन चौगुले यांनी कॅसेट्स गायकीच्या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजविले. महाराष्ट्राच्या ठामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये छगन चौगुले यांच्याच कॅसेट्सचा डंका वाजे. पारंपरिक जागरणाचा बाज आत्मसात केलेल्या छगन चौगुले यांच्या प्रस्तुतीला आधुनिकतेचा स्पर्श असायचा. श्राव्यदेवी गीते, खंडोबा, भैरवनाथ गीते छगन चौगुले यांनी दृश्राव्य केली. पारंपरिक जागरणाला त्यांनी सादरीकरणाच्या कौशल्याने नवे रूप दिले. अर्थात, असे असले तरी खंडोबाच्या जागरणाचा त्यांनी ऑर्केस्ट्रा होऊ दिला नाही. भैरवनाथ, काळूबाई, नवनाथ अशा देव-देवतांसोबत त्यांनी काही सामाजिक कथाही कॅसेट्सद्वारे सादर केल्या. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत पदव्युत्तर पदविका घेणाऱया विद्यार्थ्यांना ते खंडोबाचे जागरण आणि देवीचा गोंधळ शिकवित असत. सन 2004 पासून लोककला अकादमीचा प्रमुख, प्राध्यापक म्हणून मी कार्यरत असताना अािण आता डॉ. गणेश चंदनशिवे कार्यरत असताना आम्ही सतत छगन चौगुले आणि त्यांचे साथीदार शांताराम शिणगरे यांचे गोंधळ व जागरण प्रशिक्षणात सहकार्य घेत होतो. ‘घरात रहा, आनंदीत रहा, कोरोनाला हरवा आणि घरच्यांना जपा’ असा संदेश अलीकडेच छगन चौगुले यांनी आपल्या घरी बसून गाण्यातून दिला होता. दुर्दैवाने त्याच कोरोनाने गुरुवारी त्यांचा बळी घेतला. हा एक विचित्र योग आहे. परंपरा आणि नवतेचा सुंदर समन्वय घडविणारा हा एक प्रख्यात लोकगायक छगन चौगुले यांच्या रूपाने खंडोबा गीतांचा अमोल ठेवा मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेला.

आपली प्रतिक्रिया द्या