लोहमार्ग पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

लोहमार्ग पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या तरुणाचा मैदानावरच हृदयविकाराच्या तीव झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे काही काळ भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला.

शहरात लोहमार्ग पोलिसांच्या 93 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया टीव्ही सेंटर येथील गोकूळ मैदानवर सुरू आहे. शनिवारी सकाळी 907 उमेदवारांची मैदनी चाचणी होती. त्यापैकी 678 उमेदवार उपस्थित होते. यापैकी 592 उमेदवार मैदानी चाचण्यांसाठी पात्र ठरल्याने त्यांची मैदानी चाचणी सुरू होती. सांगली जिल्हय़ातील पलूस तालुक्याच्या मोराळे येथील संग्राम धोंडिराम शिंदे (23) हा तरुण भरतीसाठी आला होता. तो 1600 मीटरसाठी धावत असतानाच अचानक चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

संग्रामचे स्वप्न अधुरेच

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जवळपास साडेचारशे किलोमीटर प्रवास करून संग्राम शिंदे हा भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. मात्र नियतीने त्याच्यावर घाला घातला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.