Chhatrapati sambhaji nagar – तब्बल दहा लाख हुंड्याची मागणी; फौजदारावर गुन्हा

कायद्याचे रक्षण करताना सर्वसामान्यांवर आणि विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी जबाबदारी असलेल्या फौजदारानेच चक्क आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हुंड्याची मागणी रक्कम तब्बल १० लाख होती. दरम्यान, त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर या फौजदारावर गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनीत राहणारी करिश्मा (वय २६) हिचा विवाह पैठण तालुक्यातील बेंबळेची वाडी येथील रामचंद्र किसन बहुरे यांच्यासोबत २३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजपूत रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. या दाम्प्त्याला ७ वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर सात वर्ष सासरच्यांनी आणि पतीने करिश्मा हिस चांगली वागणूक दिली. त्यानंतर पतीकडून त्रास सुरू झाला. पोलीस उपनिरीक्षक असलेले रामचंद्र बहुरे यांनी पत्नीकडे दुर्लक्ष केले. ते घरातून गायब राहत होते. त्यामुळे ते अधून-मधून पत्नीकडे जात होते. त्यावर पत्नी करिश्मा हिने आठ दिवस घरी येत नाही, त्यामुळे तुमचे वास्तव्य कुठे असते, अशी विचारणा केली. त्यावर रामचंद्र बहुरे यांनी संताप व्यक्त करीत तुझ्या आई-वडिलांनी लग्न थाटामाट केले नाही, हुंडापण दिला नाही म्हणत वाद घातला. त्यानंतर त्यांनी माहेरहून दहा लाख रुपयांचे सोने आणण्याची मागणी पत्नीकडे केली. सोने आणणार नसेल तर तू माहेरीच रहा, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून छळ सुरू असल्याने करिश्माने हा प्रकार तिच्या सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यावर त्यांनी देखील रामचंद्र यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, परिस्थिती बदलली नाही.

दरम्यान, एप्रिल २०२३ मध्ये रामचंद्र बहुरे पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ते प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेले. यावेळी त्यांनी करिश्माला देखील सोबत घेऊन जात दीड महिना नाशिक येथील नातेवाईकांच्या घरी ठेवले होते. त्यावेळी दर रविवारी ते भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुन्हा सातारा परिसरातील राहत्या घरी तिला आणण्यात आले. २०२४ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामचंद्र बहुरे यांची सातारा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती मिळाल्यानंतर घरी न येताच पोलीस
ठाण्यात त्यांनी मुक्कम सुरू केला. त्यामुळे मुलगी माही सोबत करिश्मा हिने पोलीस ठाणे गाठून, भेट घेऊन घरी येण्याची मागणी केली. त्यावर दहा लाख रुपयांचे सोने आणल्याशिवाय तुझ्याशी बोलणार नाही आणि घरी येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पत्नी करिश्मा हिने महिला सहाय्यता कक्षात मार्च २०२४ मध्ये तक्रार दिली होती. या सहाय्यता कक्षात नांदावयास तयार असल्याचे तसेच मुलीच्या शाळेचा आणि घर खर्च देतो, असे त्यांनी लेखी दिले.

प्रत्यक्षात मात्र, जबाबदारी पार पाडण्यास नकार दिला. त्यामुळे करिश्मा हिने पुन्हा ५ जुलै २०२५ मध्ये भरोसा सेलकडे तक्रार केली. भरोसा सेलच्या वतीने वारंवार संपर्क करून आणि तारखांना हजर राहण्यास सांगूनही बहुरे हजर राहिले नाही. त्यामुळे अखेर सातारा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे (रा. सध्या पोलीस मुख्यालय, धाराशिव) विरुद्ध पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख करीत आहेत.