
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली असून, ती मागणी तत्काळ मान्य करण्यात आली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत शैक्षणिक सुधारणांसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या व प्रस्ताव मांडण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारकडून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशव्यापी शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली. ही मागणी तत्काळ मान्य करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित सचिवांना केंद्रीय पाठय़पुस्तक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठय़पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्याचे निर्देश दिले.