
पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा भाजपकडून मिरवण्यात येतो. मात्र, आता भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढल्याने भाजपची गोची होत आहे. या आयारामांमुळे पक्ष अडचणीत येत आहे. तसेच आयात केलेल्या खासदारांबाबत पश्न विचारण्यात आल्यावर केंद्रीय मंत्र्यांनाही सारवासारव करावी लागत आहे. याचा प्रत्यय नुकताच साताऱ्यात आला.
भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवणे, कारची रेस, डान्स करण्यामुळे सतत चर्चेत असतात. अशातच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा सातारा दौऱ्यावर होते. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या डान्स आणि कॉलर उडवण्याबाबत अजय मिश्रा यांना पत्रकाराने सवाल केला. या प्रश्नाने अडचणीत आलेल्या अजय मिश्रा यांना सारवासारव करावी लागली आहे. तसेच त्यावेळी त्यांच्या बाजूलाच उदयनराजे भोसले बसले होते. त्यामुळे यावर काय बोलावे, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
अजय मिश्रा यांना साताऱ्यात एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, तुमचा पक्ष नेहमी शिस्तीबाबत बोलतो. मात्र, तुमच्या बाजुला बसलेले खासदार खुलेआम कॉलर उडवतात. मुलींबरोबर डान्स करतात. हीच भाजपची शिस्त आहे का? ते असं करत असतील, तर चांगलं आहे का? या प्रश्नाने मिश्रा अडचणीत आले होते. यावर बाजू सावरत अजय मिश्रा म्हणाले, आमच्या पक्षात शिस्त आहे. कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर आम्ही बोलू शकत नाही. भाजपच्या कोणत्या कार्यक्रमात त्यांनी डान्स केलाय का? ते व्यक्तीगत आयुष्यात काय करतात, हा आमचा विषय नाही. ते कोणत्या कार्यक्रमाला जातात, काय करतात, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे म्हणत मिश्रा यांनी सारवासारव केली.



























































