
कोरोना काळात पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. यात महिला पोलीसही मागे नाहीत. याचे ताजे उदाहरण म्हणजे एक गरोदर महिला पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. गरोदर असूनही जीवाची पर्वा न करता ती भर उन्हात आपले कर्तव्य बजावत आहे. तिच्या या कर्तव्यनिष्ठेला पोलिसांसह सामान्य लोकांनीही सलाम ठोकला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत छत्तीसगडमध्ये हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताच्या बाहेर जात असताना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. या कठिण काळात ही गरोदर महिला पोलीस हातात लाठी घेऊन रस्त्यावर उतरली आहे. भर उन्हात रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावणाऱ्या या लेडी पोलीस ऑफीसरच्या धाडसीपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
शिल्पा साहू असे या महिला पोलीस नाव आहे. त्या वायरल व्हिडीओत ती एका हातात लाठी घेऊन तोंडावर मास्क लावून रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहे. हा व्हिडीओ बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा येथील आहे. ही महिला पोलीस लोकांना घरात थांबण्याचे, विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. शिल्पा शाहू यांनी नक्षलग्रस्त भागात चांगले काम केलेले आहे.
छत्तीसगडच्या अॅडिशन ट्रान्सपोर्ट कमिशनर दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर डीएसपीचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहीली आहे की हा फोटो दंतेवाडा डीएसपी शिल्पा साहू यांचा आहे. गरोदर असतानाही भर उन्हात रस्त्यावर उभे राहून आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत आहे. लोकांना कोरोनाबाबत जनजागृती करत आहे. कोरोना संक्रमणाची दुसरी लाट धोकादायक असून पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. तुम्हीही जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडा, घरात सुरक्षित राहा असे आवाहन त्या करत आहेत.
हा व्हिडीओ सध्या जबरदस्त वायरल होत आहे. यानंतर त्यांच्या कार्याला सगळेच सलाम करत आहेत. अनेकांनी त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.




























































