न्यायमूर्ती निकाल सोडून इतर बऱ्याच गोष्टी करायचे! सरन्यायाधीशांनी ऐकवला मुंबई हायकोर्टातील मजेशीर किस्सा

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी न्यायमूर्तींबद्दल खुल्या कोर्टात मजेशीर किस्सा ऐकवला. दीर्घकाळ चालणाऱया सुनावणीवेळी आमचे सहकारी न्यायमूर्ती लाकडी कोरीव काम करायचे, चित्र रेखाटायचे, निकाल देणे सोडून इतर बऱ्याच गोष्टी करायचे, अशी आठवण सरन्यायाधीश गवई यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱया सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितली. त्यांनी हा किस्सा ऐकवताच न्यायालयात एकच हशा पिकला.

राज्यांच्या विधिमंडळांनी सादर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालमर्यादा आखून द्यावी का, यासंदर्भातील विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात दीर्घ सुनावणी चालली. तब्बल दहा दिवस सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांच्या नेतृत्वाखालील पाचसदस्यीय पूर्णपीठाने निकाल राखून ठेवला. सुनावणीमध्येच सर्व न्यायमूर्ती परस्परांशी बोलत होते. त्याला अनुसरूनच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लिप रीडिंगचा मुद्दा उपस्थित केला. ‘मी लिप रीडिंग शिकलो असतो तर बरे झाले असते. जेव्हा आपण युक्तिवाद सादर करत असतो आणि न्यायमूर्ती आपापसात बोलत असतात तेव्हा मी अंदाज लावतो, असे मेहता यांनी सांगितले. त्यावर सरन्यायाधीश गवई यांनी मजेशीर किस्सा ऐकवला. आम्ही तीन आठवडय़ांपासून जो युक्तिवाद ऐकला त्यासंबंधी बोलत नव्हतो. हे आमच्या मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सहकाऱयासारखे नाही, जे दीर्घकाळ चालणाऱया युक्तिवादावेळी चित्र काढायचे, लाकडी कोरीव काम करायचे, निकाल देणे सोडून इतर गोष्टी करायचे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

वकिलांच्या वाचनाच्या गतीवर कोर्ट चकीत

वकिलांच्या वाचनाच्या गतीबद्दल सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. आपण वकिलांच्या वाचनाच्या गतीची बरोबरी करू शकत नाहीत, असे ते म्हणाले, मी सहा वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झालो, मात्र अद्याप दिल्लीतील वकिलांशी ताळमेळ ठेवू शकलो नाही. जे पहिले वाक्य वाचतात, नंतर आम्ही दुसऱया वाक्याकडे जाण्यापूर्वीच दहावे वाक्य वाचत असतात, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.