
कायदा मंत्र्यांशी मला वाद घालायचा नाही, असे नमूद करत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी न्यायवृंद पद्धतीचे जोरकसपणे समर्थन केले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर बाह्य प्रभावापासून तिचे संरक्षण केले पाहिजे, असे परखड मतही सरन्यायाधीशांनी मांडले.
न्यायवृंद पद्धतीवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्याअनुषंगाने इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे भाष्य केले. प्रत्येक पद्धत परिपूर्ण नसते, मात्र ही उपलब्ध असलेल्या पद्धतींपैकी सर्वोत्तम आहे. मौल्यवान असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा तिचा उद्देश आहे, असे सांगून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी सध्या असलेल्या न्यायवृंद पद्धतीचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समर्थन केले.
भिन्न दृष्टिकोन असण्यात गैर काय?
न्यायालयांमध्ये नियुक्त्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्या नावांची शिफारस केली होती, ती मान्य न करण्यासाठी सरकारने दिलेली कारणे न्यायालयाने उघड केल्याबद्दल किरण रिजीजू यांनी नापसंती व्यक्त केली होती, त्यावर सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘कायदा मंत्र्यांशी मी वाद घालू इच्छित नाही. भिन्न दृष्टिकोन असण्यात गैर काय? आकलनाबाबत मतभेद हे असणारच. ते स्वाभाविक आहे,’ असे ते म्हणाले.

























































