कोर्टाचा विलंब न्यायाचा विनाश करतो, सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन

कोर्टात दाद मागताना अनेकदा न्यायाला विलंब होतो. हा न्यायालयीन विलंब एखाद्याला केवळ न्याय नाकारतच नाही तर न्यायाचा विनाश करतो, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले. मुंबई विद्यापीठात व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई बार असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ञ फली नरीमन यांच्या स्मृतीनिमित्त मुंबई विद्यापीठ येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमावेळी सरन्यायाधीशांनी न्यायालयांच्या स्वायत्ततेवर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश म्हणाले की, अनेकदा सरकारी किंवा प्रशासकीय कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होते. अशा वेळी उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत दिलेला स्थगिती आदेश हा त्या नागरिकांसाठी न्यायाचा एकमेव अनुभव असतो. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, एखाद्या शेतकऱ्याची जमीन जप्त केली जात असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने प्रवेश नाकारला जात असेल तर अशा प्रकरणात कोर्टाकडून विलंब झाल्यास त्या व्यक्तीला न्याय मिळणार नाही तर न्याय नष्ट होतो असे सरन्यायाधीश म्हणाले. या कार्यक्रमावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व इतर न्यायमूर्ती तसेच मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई हायकोर्टाचा इतर न्यायालयांच्या समोर आदर्श

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा आज हॉटेल ताज येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालय ही केवळ एक संस्था नाही तर ती संस्कृती आहे. या वास्तूने देशाच्या न्यायव्यवस्थेची शान वाढवली आहे. इतकेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाने देशातील इतर हायकोर्टांसमोर आदर्श घालून दिला आहे, असे ते म्हणाले.