
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी भाषेतून भाषणाची सुरुवात केली. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे असा सवाल करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
आषाढी बिज हा दिवस कच्छमधील सर्व जातीजमातीचे लोक नवीन वर्ष म्हणून साजरे करतात. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कच्छ अस्मिता मंचाने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणाची सुरुवात त्यांनी कच्छी भाषेतून केली. ‘कच्छ पागडी कोणा शिरे? आ कार्यक्रम मां पधारेल कच्छी, वागड, पटेल तथा कच्छ मां रहेता तमाम भाईओ तथा बहनोनें आषाढी बिज नवा वर्षनी हार्दिक शुभेच्छा अने बधायों’ अशा वाक्यांनी शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीत सर्वांचे आभार मानले आणि शेवटी मग मराठीतून बोलण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला आहे. ‘आम्हाला स्टॅलिन सारखा स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणारा आणि मान राखणारा हवाय, गुजरातचा गुलाम नाही, 107 हुतात्मांचा आणि मराठी भाषिकांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मराठी राज्यात हे चाललंय काय? हेच का ते बाळासाहेबांचे विचारट’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री पदावर बसवल्यापासून काय काय बघावं लागतंय. म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो. बाळासाहेब कधी हिंदी, गुजरातीत भाषण देत नव्हते.. स्वतःच्या भाषेसाठी कट्टर आणि अभिमानी होते’, अशी एक आणखी प्रतिक्रिया आली आहे.
‘सुरत, बडोदा या शहरात अनेक मराठी माणस वास्तव्यास आहेत, पण गुजरातचे मुख्यमंत्री कधी मराठीत संवाद साधताना दिसत नाहीत’, अशी देखील प्रतिक्रिया व्हायरल व्हिडीओ खाली पाहायला मिळते.

























































