मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अॅक्शन मोडमध्ये, आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधक कितीही खालच्या स्तरावर जाऊ शकतात. ते आरोप करून जनतेला भरकटवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याजी गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील, अशा शब्दांत शिवसेना नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना रविवारी सुनावले.

आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी मतदारसंघात रविवारी विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधक आरोप-प्रत्यारोप करून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाइव्हमध्ये आहेत आणि जनताजनार्दन मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्यासोबत ठाम उभा आहे. मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यास तयार आहेत; पण आम्हीच ओमायक्रोनमुळे काळजी घेत आहोत. विरोधक कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

विरोधक राज्यपालांकडे बसलेले असतात

विरोधकांनी राज्यपालांकडे जाऊन केलेल्या सरकार बरखास्तीच्या मागणीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधकांना लोक विचारत नाहीत. इतर कुठेही जाऊन बोंबाबोंब करण्याची त्यांना संधी नाही. त्यामुळे ते राज्यपालांकडे जातात आणि निवेदन देतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. ते पुढे म्हणाले, लोकांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री या सर्वांवर जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. पण खोटं बोल आणि रेटून बोल एवढेच काम विरोधक करीत आहेत.

निवडणुका येतात-जातात, आम्ही नेहमीच काम करतो!

निवडणुका येत-जात असतात. आम्ही नेहमीच काम करत असतो. कितीही काम केले तरी विरोधक टीका करतातच. त्यांना ही कामे दिसतच नाहीत. तरीही विरोधकांचे माझ्यावर लक्ष आहे हे पाहून बरं वाटलं, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

कामावर रेटिंग झालं तर शिवसेनाच नंबर वन

निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणूक असताना-नसताना काम करत असतो. शिवसैनिक तर तिकिटाची इच्छा न बाळगता काम करतात. जर असे कार्यकर्ते, पक्ष असेल तर जनतेची सेवा 24 तास होत असते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.