ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही, पेन, पुस्तक देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही, पेन, पुस्तक शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी सरकार संपूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येरवडा येथील सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने साथ दिल्याने महामंडळ अस्तित्वात आले. ऊसतोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील 13 जिह्यांतून येणाऱया 9 ते 10 लाख ऊसतोड कामगारांना आरोग्य, शिक्षण आदी सुविधा देताना त्याला ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यांची पेन्शन, तात्पुरती घरे, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल. ऊसतोडणीसाठी आधुनिक साधनांच्या निर्मितीबाबतही विचार करावा. त्याचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांच्या मुलांना प्रगतीची संधी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊसतोड कामगारांची सावकारांकडून पिळवणूक केली जाते. या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

20 वसतिगृहे सुरू करणार

ऊसतोड कामगार ऊन, पाऊस, थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत, मेहनत करून आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. या मुलांच्या हातात ऊस तोडणी कोयत्याऐवजी वही-पेन पुस्तके दिली पाहिजेत. मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून 20 वसतिगृहे भाडय़ाच्या जागेत सुरू करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.