अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वीटभट्टीसह हॉटेल्स, किराणा व कापड दुकानात राजरोस बालकामगार

83

सामना प्रतिनिधी, परभणी

शासनाने बाल कामगारांना कामावर ठेवू नये, यासाठी वटहुकूम जारी केला असताना देखील कामगार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्वच वीट भट्ट्यांसह हॉटेल्स, किराणा व कापड दुकानात राजरोस बालकामगार काम करताना आढळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अत्यल्प दरात बाल कामगार उपलब्ध होत असल्याने बेरोजगारीचा फायदा घेत बाल कामगांरांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ हा चिंतेचा विषय बनली आहे.

बाल कामगरांना काम लावण्यात येवू नये, तसेच त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी भरमसाठ कायदे करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कामगार अधिकारी हे केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा सवाल केला जात असून जोपर्यंत कोणाची तक्रारच येत नाही, तोपर्यंत कामगार अधिकारी हे आपली खुर्ची सोडण्यासाठी तयार नसतात. याचा पुरेपूर फायदा व्यवसाय करणारे घेत आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्यांमध्ये बाल कामगार मोठ्याप्रमाणात ठेवले जात आहेत. कामगारांना दिला जाणारा पगार परवडू शकत नाही. त्यामुळे अनेक प्रतिष्ठाने कामगारांऐवजी बाल कामगारांकडून कामे करुन घेत आहेत. बाल कामगारांच्या संदर्भात स्व. श्रीनिवास कुलकर्णी यांनी परभणी जिल्ह्यात मोठा आवाज उठविला होता. कुलकर्णी यांच्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील बाल कामगारांची संख्या देखील कमी होण्यास मदत झाली होती. सध्या बाल कामगरांची बाजू मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व अभावामुळे जिल्ह्यात नव्याने बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. रखरखत्या उन्हामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्तीच्या दुकानात सर्रासपणे बाल कामगारांकडून कामे करुन घेतली जातात. छोट्या मोठ्या व्यवसायिकांमध्ये देखील बालकामगारांना कामास लावले जाते. अनेक दुकानांमध्ये ‘येथे नोकरांना दररोज पगार दिला जातो’. असे फलक लावून कामगारांऐवेजी बाल कामगारांकडूनच काम करुन घेण्याची प्रथा रुढ झाली आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे कामगार अधिकारी का डोळेझाक करतात हा चिंतेचा विषय बनला आहे. केवळ अभियान राबवून बालकामगरांना कामापासून वंचित केले जात असल्याचा प्रकार केला जातो. अभियानानंतर मात्र राजरोसपणे बालकामगारांकडूनच सर्व प्रकारची कामे उरकली जातात. कामगार अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्रतिष्ठानवर धाडी टाकून जेथे बाल कामगारांकडून कामे करून घेतली जातात. त्यांच्यावर कठोर शिक्षेचा बडगा उगारावा अशी मागणी कामगार दिनानिमित्ताने जोर धरू लागली आहे. परभणी येथे औद्योगिक वसाहत नसल्याच्या कारणाने अनेकजण बेरोजगाराच्या खाईत लोटल्या गेले आहेत. त्यात भरीसभर बाल कामगारांची होत आहे. अनेकांच्या हाताला कामे नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे हेच काम बाल कामगारांकडून अत्यल्प दरामध्ये करुन घेतले जात आहे. त्यामुळे बाल कामगारांचे होणारे शोषण त्वरीत थांबविण्यात यावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या